ठाणे जिल्ह्य़ात सात महिन्यांत बालमृत्यूंत वाढ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदूषण आणि कुपोषणामुळे गेल्या सात महिन्यांत ठाणे जिल्ह्य़ात एक महिना  आणि त्यापेक्षा कमी वय असलेल्या ५६ अर्भकांना जीव गमवावा लागल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. चार मातांनाही जीव गमवावा लागला आहे. केंद्र शासनाने गर्भवतींच्या पोषणासाठी मदत जाहीर केली असली, तरी ती अद्याप कागदोपत्रीच आहे. लाभार्थी मात्र लाभांपासून वंचित आहेत.

बालमृत्यूंची ही आकडेवारी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच अंबरनाथ आणि बदलापूर पालिका रुग्णालयांमधील असल्याचे जिल्हा रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. मृत बालकांमधील १३ बालके कमी वजनाची होती. १५ बालकांना श्वसनाचा त्रास होता. आईच्या गर्भात मिळणारी हवा तुलनेने प्रदूषणरहित असते. त्यामुळे कमी वजनाच्या बाळांना जन्मानंतर प्रदूषित हवेशी जुळवून घेणे अशक्य होते. त्याचा परिणाम त्यांच्या हृदयावर होऊन ती बालके दगावतात, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी सांगितले.

उर्वरित २७ अर्भके जन्मत:च आजारी असल्याने दगावली असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व मृत बालके २८ दिवसांच्या आतील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. चारपैकी दोन मातांचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात तर दोन मातांचा मृत्यू ग्रामीण रुग्णालयात झाल्याचे जिल्हा रुग्णालयाने स्पष्ट केले.

अर्भक दगावल्याची कारणे

* कमी वजन – १३

* श्वसनविकाराने मृत्यू -१५

* संसर्ग – १

* इतर आजार – २७

मातामृत्यू

* प्रसूतीपूर्व रक्तस्राव -३

* प्रसूतीनंतर रक्तस्राव -१

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 56 child deaths due to pollution malnutrition
First published on: 24-10-2017 at 03:05 IST