ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातून नवजात अर्भकाची चोरी करणाऱ्या दाम्पत्याच्या घरी सापडलेली  सहा अपत्ये स्वत:ची असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या सर्व मुलांना शासकीय बालसुधार गृहात ठेवण्यात आल्याचे सांगितले. त्यांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

अर्भक चोरीप्रकरणी तिघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने कल्याणमधून अटक केली होती. या दाम्पत्याने घरात वृत्तपत्राखाली लपवून ठेवलेल्या त्या बाळाची पोलिसांनी सुखरुप सुटका करून त्याला आईच्या ताब्यात दिले आहे. या दाम्पत्याच्या घरात आणखी सहा मुले सापडली आहेत. यात दोन महिने आणि तीन, पाच, सात, नऊ आणि ११ वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश आहे. यात पाच मुली आहेत.

गुडीया सोनू राजभर (३५), सोनू परशुराम राजभर (४०) आणि  विजय कैलास श्रीवास्तव (५५) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. कल्याण पूर्वेतील पिसवली गावातील एका भाडय़ाच्या खोलीत राजभर दाम्पत्य राहते. भिवंडी येथील पोलिस वसाहतीजवळील आदिवासी पाडय़ात मोहिनी मोहन भवार ही महिला राहते. प्रसुतीसाठी तिला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री ११ वाजता तिची प्रसुती झाली. रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक पाचमध्ये तिला आणि तिच्या बाळाला ठेवण्यात आले होते. दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास गुडीया ही महिला वॉर्डामध्ये शिरली आणि तिने मोहिनीचे बाळ चोरून नेले. आईने बाळ मागितल्याची बतावणी करून तिने मोहिनीचे बाळ चोरले होते.

याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने रुग्णालय तसेच आसपासतच्या परिसरातील सीसी टिव्हीचे फुटेजच्या आधारे तपास करून राजभर दाम्पत्य आणि त्यांचा साथीदार विजयला अटक केली, अशी माहिती ठाण्याचे सह पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली.

तसेच बाळ चोरीमागे या दाम्पत्याचा नेमका उद्देश काय होता आणि त्यांच्यावर अशाप्रकारचे यापुर्वी गुन्हे दाखल आहेत का, याचाही तपास सुरु असल्याचे सह पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले.

अशी चोरी झाली..

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात शनिवार सायंकाळपासून गुडीया राजभर ही फेरफटका मारत होती. रुग्णालयासमोरील एका पोळी भाजी केंद्रामध्ये तिने जेवण केले आणि त्यानंतर रुग्णालयामध्ये पाळत ठेवून तिने रात्री अडीच वाजता संधी मिळताच बाळाची चोरी केली. तेथून एका रिक्षातून तीने ठाणे स्थानक गाठले. पोलिसांनी पकडू नये म्हणून मिळेल त्या लोकलमध्ये बसायचे तिने ठरविले. त्यानुसार अंबरनाथ-सीएसटी लोकलमध्ये बसून ती सीएसटी स्थानकात गेली. हीच लोकल सीएसटीहून टिटवाळ्याला निघाल्याने ती त्यामध्येच बसून राहीली आणि त्यानंतर डोंबिवली स्थानकात बाळाला सोबत घेऊन उतरली. त्यानंतर रिक्षा पकडून तिने पिसवली गावातील घर गाठले, अशी माहिती तपासात पुढे आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.