शहर स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून ‘व्हिजन डोंबिवली’तर्फे रविवारी के. बी. वीरा शाळेच्या आवारात घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ‘व्हिजन डोंबिवली’ गटाने ७१३ किलो ई कचरा जमा केला. सर्वसामान्य रहिवासी तसेच रुग्णालयांमधून अशा प्रकारचा कचरा मोठय़ा प्रमाणावर जमा करण्यात आला.
ई कचरा जमा करणाऱ्या रहिवाशांना व्हिजन डोंबिवलीतर्फे एक पावती देण्यात येत होती. हा कचरा पुणे येथील ‘कुलदीप ई स्क्रॅप मटेरिअल’ संस्थेच्या स्वाधीन करण्यात आला, असे या योजनेचे समन्वयक डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी सांगितले. व्हिजन डोंबिवलीने शहर स्वच्छतेबाबत अनेक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा भाग म्हणून रविवारी वीरा शाळेच्या आवारात घराघरांतील ई कचरा व्हिजनच्या केंद्रावर आणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या केंद्रावर संगणक, माऊस, भ्रमणध्वनीचे चार्जर, पडीक भ्रमणध्वनी, टंकलिखित फलक याशिवाय काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जमा केल्या. रहिवाशांनी ई कचरा कचराकुंडीत न टाकता, तो योग्यरीतीने विल्हेवाट होण्यासाठी व्हिजनकडे जमा करण्याचे आवाहन केले. त्याप्रमाणे या मोहिमेला सर्वसामान्य रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.
डोंबिवलीतील ई कचरा दररोज जमा करता यावा यासाठी पालिकेने पूर्व आणि पश्चिम भागात व्हिजन डोंबिवलीसाठी दोन जागा द्याव्यात, जेणेकरून ई कचरा दररोज त्या केंद्रावर जमा करता येईल आणि दोन्ही केंद्रांवर दोन ते तीन हजार किलो ई कचरा जमा केला की तो एकदम नष्ट करणाऱ्या कंपनीच्या स्वाधीन करणे शक्य होईल, असे प्रज्ञेश प्रभुघाटे, यांनी सांगितले. दोन्ही भागांत जागा मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे नगरसेवक पुराणिक यांनी सांगितले. या उपक्रमात डॉ. नितीन जोशी, अभिजीत जोशी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.