कल्याण: कल्याणमधील पारनाका येथील मुरलीधर आळीतील डॉ. केतन सोनी यांच्या नंदादीप बालकाश्रमातून जिल्हा बाल विकास अधिकारी, बाल संरक्षण आणि संगोपन अधिकारी तसेच चाईल्ड लाईन, सखी वन स्टॉप केंद्र यांनी एकत्रित प्रयत्न करुन पोलिसांच्या सहकार्याने ७१ बालकांची सुटका केली. ही बालके शासकीय बालसंगोपन केंद्र, सज्ञान मुले बालसुधार गृह विभागाकडे पाठविण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवजात, दोन वर्ष ते १० वर्ष वयोगटातील मुलांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये २३ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर भागातून ही बालके आरोपी डॉ. केतन सोनी यांनी गरजू दाम्पत्यांकडून खरेदी केली असण्याचा शासकीय अधिकाऱ्यांना संशय आहे. डॉ. सोनी पारनाका येथे अनाथ व गरजू मुलांसाठी मागील तीन वर्षांपासून वसतीगृह चालवित आहेत. या वसतीगृहात अनाथांबरोबर नवजात बालके खरेदी करुन आणून ठेवली जातात, अशा तक्रारी पुढे येत आहेत. तेथे त्यांना पुरेसे अन्न, कपडे दिले जात नाहीत. त्यांचा छळ केला जातो, अशा तक्रारी बालकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनकडे आल्या होत्या. या संस्थांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. महेश गायकवाड, बाल संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव यांना संपर्क केला. सखी वन स्टापॅ केंद्राच्या विधी सल्लागार सिध्दी तेलंगे, चाईल्ड लाईनच्या श्रध्दा नारकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चव्हाण यांनी बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने अनाथ वसतीगृहावर छापा टाकला. त्यांना तेथे ७१ मुले आढळून आली. ही मुले कोठुन आणली, कोणत्या कायद्याने ती येथे ठेवली जातात. वसतीगृह चालविण्याच्या परवानग्या याविषयी कोणतीही माहिती डॉ. सोनी देऊ शकले नाहीत. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण सुरू असतानाच, डॉ. सोनी यांनी डोंबिवलीत संतोष व प्रिया अहिरे दाम्पत्याकडून एक नवजात बालक एक लाख रुपयांना खरेदी केले होते. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.  या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे बाल संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 71 children rescued from doctor s illegal orphanage in kalian zws
First published on: 28-11-2021 at 02:49 IST