मलंगगड परिसरातील घटना, बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी
अंबरनाथ तालुक्याच्या वेशीवर असलेल्या मलंगगड परिसरात एका बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. कुटुंबावर झालेला हा हल्ला घरातील महिलेने परतवून लावला. या धाडसी महिलेच्या प्रसंगावधानाने पती आणि मुलीचे प्राण वाचले आहेत.गुरुवारी मध्यरात्री बिबट्याने मलंगगड परिसरात घरात झोपलेल्या एका कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात पप्प्या बाळ्या पवार हे जखमी झाले. यावेळी पप्या यांची पत्नी सखू हिने बिबट्या घरात शरताच आपल्या मुलीला बाजूला घेत हाती काठी घेतली. सखू यांनी बिबट्याचा धाडसाने प्रतिकार केला.
हेही वाचा >>>ठाण्यात ३ ते ६ फेब्रुवारीपर्यंत ‘क्रेडाई एमसीएचआय’च्या वतीने प्राॅपर्टी मेळाव्याचे आयोजन
सखू यांच्या प्रसंगावधानाने बिबट्याही भेदरला. त्याने तात्काळ तेथून पळ काढला. सखू यांच्या धाडसाने त्यांचे पती आणि मुलगी सुखरूप बचावली. मात्र या हल्ल्यात तिचा पती पप्या हा जखमी झाला आहे. त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्याला जखमा झाल्या असून त्याच्यावर सध्या कळवा येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मलंगगड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र बिबट्याच्या हल्ल्यानंतरही न घाबरता मोठ्या धाडसाने आपल्या कुटुंबाचे बिबट्यापासून रक्षण करणाऱ्या धाडसी सखुबाईचे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.