ठाणे: पोलीस हवालदार सचिन खटे यांचा मार्च महिन्यात अपघाती मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासाअंती एका दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीजवळून जात त्यांना हुलकावणी दिली. त्यामुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते एका भिंतीवर धडकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सचिन खटे हे कार्यरत होते. १८ मार्च या दिवशी ते रघुनाथ नगर परिसरात दुचाकीवरून गस्ती घालत होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीमागे पोलीस शिपाई चव्हाण हे देखील होते. रघुनाथ नगर येथील संकल्प चौक परिसरात ते आले असता, त्यांचा अपघात झाला. या घटनेत खटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान २४ मार्चला त्यांचा मृत्यू झाला. तर चव्हाण हे जखमी झाले होते. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास वागळे इस्टेट पोलिसांकडून सुरू होता. तपासाअंती आढळून आले की, एक भरधाव दुचाकीस्वार त्यांच्या दुचाकीला हुलकावणी देऊन पुढे गेला होता. त्यावेळी खटे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यांची दुचाकी रस्त्यालगतच्या पदपथावर गेली.
त्यानंतर पदपथालगत असलेल्या भिंतीला दुचाकी धडकली. त्यामुळे त्यांच्या डोक्यातील शिरस्त्राण (हेल्मेट) डोक्यातून खाली पडले. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी गुरुवारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.