कल्याण पश्चिमेत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ते काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हे रस्ते काम पूर्ण करायचे असेल तर आपणास पहिले एक लाख रुपयांची खंडणी द्या. अन्यथा काम बंद करा, अशी धमकी एका राजकीय पक्षाशी संबंधित इसमाने ठेकेदार कंपनीला दिल्याने खळबळ उडाली आहे. वंडार रामू कारभारी असे खंडणी मागणाऱ्याचे नाव आहे. तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याची चर्चा शहरात आहे. एन. ए. सी. कन्सन्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापक खालीक मोहद्दिन पाटणकर यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी वंडार कारभारी विरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीची टिटवाळ्या जवळील जंगलात हत्या
राजकीय मंडळींकडून कल्याण, डोंबिवलीत रस्ते विकास कामे, विकास आराखड्यांमधील रस्त्यांमध्ये कसे अडथळे आणले जातात याचे हे उदाहरण आहे. डोंबिवलीत नांदिवली येथील स्वामी समर्थ मठाजवळ एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचे घर विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये बांधण्यात आले आहे. हे घर आता रुंदीकरण आणि सिमेंटीकरणाच्या कामासाठी तोडले जाणार आहे. परंतु, एका लोकप्रतिनिधीने यात हस्तक्षेप केल्याने या भागातील रस्ते काम थंडावले आहे असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. असाच प्रकार बुधवारी कल्याण मध्ये पाईप लाईन रस्ता, डी. बी. चौक येथे घडला आहे.
हेही वाचा- पनवेल : पालिका सेविकेच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचे प्रकरण उघडकीस, गुन्हा दाखल
पोलिसांनी सांगितले, एन. ए. सी. कंपनीचे कल्याण पश्चिमेतील डी. बी. चौक, पाईप लाईन रस्ता येथे रस्ता रुंदीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर क्षेत्रीय पर्यवेक्षक अभियंता महेश जमाकंडी आणि इतर कामगार हे बुधवारी सकाळी काम करत होते. कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत हे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना तेथे वंडार रामू कारभारी आले. त्यांनी उपस्थित कामगार, अभियंत्यांना शिवीगाळ सुरू केली. ‘तुम्ही येथे काम कसे काय करता, असे बोलून वंडारने हे काम चालू ठेवायचे असेल तर पहिले तुमच्या साहेबांना एक लाख रुपये देण्यास सांगा. अन्यथा तुमचे काम बंद पाडले जाईल. रस्ते कामासाठी जी वाहने साहित्य घेऊन येतात ती अडवून ठेवण्यात येतील’, असा इशारा वंडार याने देखरेख कर्मचाऱ्यांना दिला. वंडार याने शिवीगाळ करुन झाल्यावर स्वताचा मोबाईल क्रमांक तक्रारदार अभियंता पाटणकर यांना दिला. बोलणे झाल्या शिवाय काम करू नये असा इशारा कामगारांना दिला.
हेही वाचा- ठाणे : भिवंडीत बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट; आणखी तीन डाॅक्टर अटकेत
रस्ते कामात अडथळा आणून सरकारी कामात हस्तक्षेप केल्या बद्दल ठेकेदार कंपनीने वंडार कारभारी विरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.