ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात दोन ठिकाणी पदपथावर शौचालय आणि त्यावर जाहिरात फलक उभारणीवरून टिका होऊ लागताच पालिकेने दोन्ही कामांना स्थगिती दिली असतानाच, त्यापाठोपाठ आता सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या ठाणे येथील पोखरण क्रमांक दोन या रस्त्याच्या प्रवेशद्वारावरच कमानी स्वरुपात महाकाय जाहीरात फलक उभारणीचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे. जाहिरात फलकाखालून वाहनांची वाहतूक होणार असल्याने भविष्यात अपघातांची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या जाहिरात फलकाच्या माध्यमातून मृत्युचा सापळा उभारला जात असल्याची टिका पालिकेवर होऊ लागली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते आणि चौकाचौकात जाहीरात फलक उभारण्यात आलेले आहे. काही ठिकाणी रस्त्यांच्या दुभाजकांमध्येही जाहीरात फलक उभारण्यात आलेले आहेत. शहरातील एकूण २७६ जाहिरात फलकांना पालिकेने परवानगी दिली आहे. काही ठिकाणी पालिकेने शौचालय उभारणीच्या मोबदल्यात त्यावर जाहीरात फलक उभारणीस परवानगी दिली होती. परंतु शौचालय उभारणी आधीच अनेक ठिकाणी जाहिरात फलकांची उभारणी करून त्यावर जाहिरात प्रदर्शित करण्यात येत आहे. असाच प्रकार सिंघानिया शाळा आणि हिरानंदानी मेडोज परिसरातील पदपथांवर दिसून आला होता. यावरून टिका होऊ लागताच पालिकेने दोन्ही कामांना स्थगिती दिली होती. त्यापाठोपाठ त्यापाठोपाठ आता सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या ठाणे येथील पोखरण क्रमांक दोन या रस्त्याच्या प्रवेशद्वारावरच कमानी स्वरुपात महाकाय जाहिरात फलक उभारणीचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे.
पोखरण रस्ता क्रमांक दोन हा माजिवाडा आणि कापुरबावडी परिसरातील मुख्य रस्त्याला जोडण्यात आलेला आहे. या रस्त्याचे काही वर्षांपुर्वी रुंदीकरण करण्यात आले. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते. घोडबंदर मार्गावर मानपाडा भागात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक जण याच मार्गे वाहतूक करून पुढे पातलीपाडा येथून घोडबंदर मार्गाने वाहतूक करतात. या भागात मोठमोठी संकुले उभी राहिल्याने या नागरिकांची वाहनेही येथूनच प्रवास करतात. अशा वर्दळीच्या या रस्त्याच्या माजिवडा परिसरातील प्रवेशद्वारावर कमान स्वरुपात जाहिरात फलकाची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या मार्गिका आणि दुभाकामध्ये लोखंडी खांब उभारून त्यावर हा जाहिरात फलक उभारण्यात येत आहे. जाहिरात फलकाखालून वाहनांची वाहतूक होणार असल्याने भविष्यात अपघातांची भीती व्यक्त होत आहे.
परवानगीनीच फलकाची उभारणी
यंदाच्या पावसाळ्यात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने जाहीरात फलक कंपन्यांना नोटीसा बजावून फलकाच्या लोखंडी सांगाड्याचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार, पोखरण रस्ता क्रमांक येथे फलकाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यापुर्वीच या ठिकाणी डिजीटल फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्याठिकाणी डिजीटल ऐवजी साधा फलक होता. आता दुरुस्ती कामाबरोबरच डिजीटल फलक उभारण्यात येत आहे. तसेच यासह सर्व जाहिरात फलक कंपन्यांना काळजी घेण्याचे निर्देश दिले असून काही घटना घडल्यास तेच जबाबदार राहणार आहेत, अशी प्रतिक्रिया ठाणे महापालिका जाहिरात विभागाचे उपायुक्त दिनेश तायडे यांनी दिली.प्रतिक्रीया
ठाणे महापालिकेचा जाहिरात विभाग कोणत्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही. गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सवाची कमान उभारण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. मग, अशा कमान स्वरुपात जाहिरात फलक उभारणी कशी परवानगी दिली जात आहे. अशा फलकांच्या माध्यमातून पालिका मृत्युचे सापळे उभे करत आहे का, अशी प्रतिक्रिया मनविसेचे सरचिटणीस संदिप पाचंगे यांनी व्यक्त केली.
ठाणे महापालिकेकडे जाहिरात फलकांबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे न्यायालयात दाद मागावी लागली आहे. आता न्यायालयाने चपराक दिल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का, मुंबईतील घाटकोपर आणि पुणे याठिकाणी जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडली. अशाच घटनांची ठाणे पालिका वाट पाहत आहे का, जाहिरात फलकातून पालिकेला असे किती उत्पन्न मिळते आणि नागरिकांच्या जीवापेक्षा हे उत्पन्न महत्वाचे आहे का, अशी प्रतिक्रिया ठाण्यातील दक्ष नागरिक चंद्राहास तावडे यांनी व्यक्त केली.