कल्याण – येथील काळा तलाव भागात बुधवारी रात्री एक १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी आणि तिच्या दोन मित्रांना या भागात फिरण्यासाठी आलेल्या तीन तरुणांनी किरकोळ कारणावरून काल रात्री बेदम मारहाण केली. या तरुणीने अनोळखी तीन इसमांविरुद्ध महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

काळा तलाव भागात काल रात्री साडेआठ वाजता एक अल्पवयीन मुलगी आणि तिचे दोन मित्र भोजन झाल्यानंतर काळा तलाव भागात फिरण्यासाठी आले होते. गप्पा मारत ते काळा तलाव भागातील संग्रहालयाजवळ आले. तेथील कट्ट्यावर ते गमती करत हसत मौजमजा करत होते. त्यांच्या बाजूला तीन तरुण बसले होते. हे तरुण आणि मुलगी आपल्याकडे पाहून आपली टिंगलटवाळी करत आहेत, असा गैरसमज करून तीन तरुणांनी अल्पवयीन मुलीला तुम्ही आम्हाला पाहून का हसता, असा प्रश्न केला.

हेही वाचा – डोंबिवलीतील डाॅमिनोज पिझ्झामध्ये नोकरानेच केली चोरी

आम्ही एकमेकांची गम्मत करत हसत आहोत, असे युवतीने तरुणांना सांगितले. त्याचा राग येऊन तिन्ही आरोपी तरुणांनी अल्पवयीन तरुणी आणि तिच्या दोन मित्रांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने तक्रारदार मुलगी आणि तिचे मित्र घाबरले. आरोपींनी जवळील धारदार वस्तूने मुलीच्या डोळ्याजवळ बुक्की मारून तिच्या डोळ्याला दुखापत केली, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – भूसंपादनाच्या कचाट्यात अडकली कल्याण, डोंबिवलीतील २९७ कोटींची मलनिस्सारणाची कामे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या आठवड्यात काळा तलाव भागात मनोरंजनामधील पाळण्यामध्ये बसण्यावरून तरुणांनी एक महिला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली होती. काळा तलाव भागात दररोज कल्याण शहर परिसतील नागरिक सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी येतात. नियमित होणाऱ्या या गुंडगिरीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पोलीस आणि पालिकेने या भागात रात्रीच्या वेळेत गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.