कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील १२ माळ्याच्या बेकायदा इमारती तोडण्यासाठी पालिकेच्या ताफ्यात जपानी तंत्रज्ञानाचे नवीन शक्तिमान कापकाम यंत्र (हाय जाॅ क्रॅकर) दाखल झाले आहे. यापूर्वी पालिकेच्या ताफ्यातील या शक्तिमान कापकाम यंत्राने सात माळ्याच्या बेकायदा इमारती जमीनदोस्त करता येत होत्या. आता या नवीन कापकाम यंत्राने १२ माळ्याची बेकायदा इमारत एक ते दोन तासात भुईसपाट करणे पालिका प्रशासनाला शक्य होणार आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दोन लाखाहून अधिक बेकायदा इमारती आहेत. या बेकायदा इमारत यादीतील बहुतांशी इमारती या सात माळे ते २३, ३३ माळ्यापर्यंत आहेत. पालिकेच्या नगररचना विभागाने परवानगी दिलेल्या, पण नगररचना अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन विकास आराखड्यातील रस्ते अंतरात फेरबदल करून काही विकासकांनी कल्याण, डोंबिवलीत नियमबाह्य इमारतींची बांधकामे केली आहेत. याप्रकरणी पालिकेत तक्रारी दाखल आहेत. काही प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत.

अशा टोलेजंग इमारतींवर कारवाई करायची असेल तर पालिकेला जेसीबी, पोकलेन, घण, हातोडे किंवा क्रॅकर यंत्राचा वापर करावा लागतो. या यंत्रणेमुळे बेकायदा इमारतीचे तोडकाम झटपट होत नाही. सात माळ्यापर्यंत बेकायदा इमारती तोडली जाईल असे शक्तिमान कापकाम यंत्र होते. ही यंत्रणा तोकडी होती. या सर्व गोष्टींचा विचार करून तोडकाम करणाऱ्या कल्याण डोंंबिवली पालिका सेवेतील ठेकेदार गिरीराज कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे देवचंद चव्हाण यांनी जपानमधील कोबेल्को कंपनी बनावटीचे शक्तिमान कापकाम यंत्र (हाय जाॅ क्रॅकर) भारतात मागवले आहे. हे यंत्र १२ माळ्यापर्यंतच्या बेकायदा इमारती, जलकुंभ एक ते दोन तासात भुईसपाट करते.

गिरीराज कन्स्ट्रक्शन कंपनीकडून पनवेल, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे काम केले जाते. हे यंत्र जपानहून मालवाहू जहाजातून चेन्नई येथे आणण्यात आले. कल्याण तालुक्यातील गोवेली गावाजवळ मोकळ्या मैदानात या शक्तिमान कापकाम यंत्राच्या सुट्ट्या भागांची जोडणी करण्यात आली. कमी वेळेत अधिकचे काम करणारे हे यंत्र आहे.

कापकाम यंत्राची रचना

हे शक्तिमान कापकाम यंत्र ३६० अंश कोनात एकाच जागेहून फिरते. ४० अंशापर्यंत फिरणारे सुरक्षित चालक खोली या यंत्रावर आहे. ३५० हाॅर्स पाॅवर क्षमतेचे इंजिन या तोडकाम यंत्राला आहे. एक हजाराहून अधिक टन वजनाचे हे यंत्र आहे. बांधकाम तोडताना तासिकेवर या यंत्राचे शुल्क आकारले जाते. उपलब्ध साधनांमधून यापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेला बेकायदा इमारत पाडण्यासाठी यापूर्वी सात ते महिना लागायचे. नवीन यंत्रामुळे हे काम एक ते दोन दिवसात होईल.

यापूर्वीच्या शक्तिमान कापकाम यंत्राने सात माळ्याची बेकायदा इमारत तोडली जात होती. त्यामुळे सातपेक्षा उंच इमारत तोडताना अनेक अडथळे येत होते. या नवीन शक्तिमान कापकाम यंत्राने १२ माळ्याची बेकायदा इमारत, धोकादायक जलकुंभ काही अवधीत तोडणे शक्य होणार आहे. – देवचंद चव्हाण संचालक,गिरीराज कन्स्ट्रक्शन कंपनी.