कल्याण: मुंबई सीएसएमटी ते टिटवाळा लोकलमध्ये बुधवारी दुपारी प्रथम श्रेणीच्या डब्यात एका प्रवाशाला दोन प्रवाशांनी शहाड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान धावत्या लोकलमध्ये बेदम मारहाण केली. प्रवाशाच्या कपाळावर आरोपींनी लोखंडी कडा मारल्याने तो जखमी झाला आहे. रवींद्र चंद्रकांत कशिवले (३४) असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ते खडवली चिंचवली येथील सैनिक शाळेत नोकरी करतात. अमित विनोद शर्मा (२८), आकाश विनोद शर्मा (२३) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही टिटवाळा भागात राहतात. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात या गुन्ह्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. हेही वाचा. डोंबिवलीत घरफोड्या वाढल्या; बंद घरे फोडण्याकडे सर्वाधिक कल पोलिसांनी सांगितले, रवींद्र कशिवले हे खडवली चिंचवली येथील सैनिक शाळेत नोकरी करतात. ते सीएसएमटी-टिटवाळा लोकलने बुधवारी दुपारी प्रथम श्रेणीच्या डब्यातून टिटवाळ्याच्या दिशेने प्रवास करत होते. त्यांच्या बाजुला त्यांनी कार्यालयीन कामासाठी लागणारी बॅग ठेवली होती. लोकलमध्ये गर्दी नव्हती. कशिवले आसनावर बसले होते. त्यावेळी आरोपींनी कशिवले यांच्या नकळत त्यांच्या बॅगमध्ये हात टाकून त्यामधील वस्तुंची, रोख रकमेची चोरी करण्याचा प्रयत्न केला. बाजुला बसलेला प्रवासी आपल्या बॅगमध्ये हात टाकून चोरी करत असल्याचे लक्षात आल्यावर कशिवले यांनी त्यांना रोखून त्यांना जाब विचारला. त्याचा राग आरोपी बंधूंना आला. शर्मा बंधूंनी कशिवले यांना आम्ही चोर आहोत का, असे प्रश्न करून तुम्ही आम्हाला असे का बोलता असे प्रश्न करून भांडण उकरून काढले. कशिवले यांना बेदम मारहाण केली. एकाने शर्मा यांच्या कपाळावर हातामधील कडा मारला. त्यामुळे त्यांच्या कपाळाला जखम झाली. मारहाणीनंतर दोन्ही आरोपी टिटवाळा रेल्वे स्थानकात उतरून निघून गेले. कशिवले यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. हवालदार के. सी. जगताप तपास करत आहेत.