कल्याण : उल्हासनगरमध्ये एका सहा दिवसाच्या बालिकेची आई, वडिलांनी एका जोडप्याला ९० हजार रूपयांना विक्री केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणात उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

उल्हासनगर ३ मधील मध्यवर्ती रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ हा बाळ विक्रीचा व्यवहार शनिवारी (ता.२५) घडला आहे. या प्रकरणाची माहिती बालिकेची आजी विजया गणेश गायकवाड (४७) यांना समजल्यावर त्यांनी तात्काळ मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विजया गायकवाड यांच्या तक्रारीवरून बालिकेचे वडील विशाल गणेश गायकवाड, बालिकेची आई सुजाता विशाल गायकवाड (रा. आनंद विहार, बदलापूर), मध्यस्थ महिला गुडिया राजेश वर्मा (रा. कल्याण डोंबिवली पालिका रुग्णालयजवळ, कोळसेवाडी, कल्याण पूर्व), जुई सागर पांडे (रा. फाॅरवर लाईन, उल्हासनगर ३), बालिकेची खरेदी करणारे पती, पत्नी नुरजहाँ गुलाम शेख, गुलाम मुस्तफा शेख (रा. सुभाषनगर, उल्हासनगर ३) यांच्या विरुध्द अल्पवयीन मुलांची काळजी व संंरक्षण कायदा कलम २०१५ चे कलम ८१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस ठाण्यातील माहिती अशी, की विशाल गायकवाड आणि पत्नी सुजाता गायकवाड यांना बाळ झाले होते. स्त्री जातीचे हे बाळ सहा दिवसाचे होते. मुलगी झाल्याने बाळाच्या आई वडिलांनी बालिकेची विक्री करण्याचा निर्णय घेतला. बाळाची आई सुजाता हिची मैत्रिण गुडिया वर्मा आणि जुई पांडे यांनी धावपळ करून बाळाची खरेदी करण्यासाठी एक जोडपे शोधले. हे बाळ उल्हासनगरमधील सुभाषनगर भागात राहत असलेल्या नुरजहाँ शेख व त्याची पत्नी गुलाम शेख यांना विकण्याचा निर्णय घेतला. बाळाच्या विक्रीची किंमत ठरल्यावर ९० हजार रूपयांना हे बाळ विशाल, सुजाता गायकवाड यांच्याकडून गुडिया, जुई यांच्या मध्यस्थीने नुरजहाँ, गुलाम शेख यांनी विकत घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उल्हासनगरमध्ये मराठा सेक्शन बौध्द विहाराजवळ राहणारी बाळाची आजी विजया यांना विशाल, सुजाताने नवजात बालिकेची विक्री केल्याची कुणकुण लागताच विजय गायकवाड यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, एक नवजात बाळाची विक्री करण्याच्या प्रकरणात एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नवजात बाळ, त्याची आई सुजाता रुग्णालयात सुखरूप आहेत. विक्री केलेले बाळ बाळ संरक्षण व संगोपन केंद्राकडे योग्य त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोपविण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशा निकम तपास करत आहेत.