डोंबिवली येथील पूर्व भागात भगतसिंग रस्त्यावर पी. पी. चेंबर्स माॅल ते सुयोग हाॅल दरम्यान रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामातील पहिल्या टप्प्यासाठी पी. पी. चेंबर्स माॅल ते सारस्वत बँक दरम्यान रस्ता ठेकेदाराकडून खोदण्यात येत आहे. हे काम करताना गुरूवारी या रस्त्यालगतची पालिकेची मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे शेकडो लीटर पाणी वाया गेले. तसेच, वीज पुरवठ्याची वाहिनी तुटल्याने येथील दोन इमारतींचा वीज पुरवठा खंडित झाला.

गुरुवारी दुपारी पालिकेची सारस्वत बँकेसमोरील स्वप्निल स्टेशनरी दुकानाजवळ ठेकेदाराच्या कामगारांकडून खोदकाम करताना जलवाहिनी फुटली. पालिकेक़डून दुपारच्या वेळेत पाणी पुरवठा सुरू असतानाच ही वाहिनी फुटली. यातील पाणी रस्त्यावर वाहू लागले. खोदलेल्या रस्त्यात पाण्याची तळी साचली. शेकडो लीटर पाणी वाया गेल्याने गुरुवारी दुपारी या जलवाहिनीवरून पाणी पुरवठा होणाऱ्या सोसायट्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.  ही माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, फ प्रभाग साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना समजताच त्यांनी संबंधितांशी संपर्क करून तातडीने जलवाहिनी फुटलेल्या भागाचा पाणी पुरवठा सुस्थितीत करण्याच्या सूचना केल्या.

हेही वाचा >>>जिल्ह्यात ५ हजार ६८२ हेक्टरवर रब्बीचे नियोजन, २ हजार ९४० हेक्टरवर कडधान्यांची लागवड

कल्याण डोंबिवली पालिकेच्या बहुतांशी जलवाहिन्या रस्त्यालगत आहेत. या जलवाहिन्यांमधून इमारतींना पाणी पुरवठा केला जातो. रस्त्यालगत जलवाहिन्या असल्याने ठेकेदाराने या भागात काम करताना जलवाहिन्या, महावितरणच्या वीज वाहिन्या तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी या भागातील रहिवाशी करीत आहेत. खोदकाम करताना जलवाहिनी फुटली तर पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग, उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे आयुक्तांचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पी. पी. चेंबर्स भागातील पालिकेची मुख्य जलवाहिनी रस्त्याच्या खाली आहे. या वाहिनीवरून सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्यात आला आहे. खोदकाम करताना जलवाहिनी खराब झाली असेल. जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू होताच फुटलेल्या वाहिनीतून अधिक दाबाने पाणी बाहेर आले. वाहिनीतील पाण्याचा दाब कमी झाला की तातडीने ही जलवाहिनी सुस्थितीत केली जाईल. बंद पडलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी काम करत आहे.- अतिश गवस ,प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, एमएमआरडीए.