लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: भिवंडी येथील टेमघर भागात राहणाऱ्या कविता गौड (३४) या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला असून याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात सासरच्यामंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कविता ही पती सुनिल, सासू- सासरे, दिर, नणंद यांच्यासह भिवंडीत वास्तव्यास होती. सासरच्या मंडळींनी तिला माहेरून मोटार सायकल आणण्यास सांगितले होते. त्यास तिने नकार दिल्याने सासरची मंडळी तिला सतत शिवीगाळ, मारहाण करीत होती. तसेच रक्षाबंधन सणासाठी तिला माहेरी जाऊ दिले नव्हते, असा आरोप महिलेच्या भावाने केले आहेत. या सर्व त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोपही त्याने केला आहे.
हेही वाचा… ठाण्यात दोन पनीर उत्पादकांवर कारवाई; ४ लाख १ हजार ३७४ रुपये किंमतीचे पनीर, दूध साहित्य जप्त
याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात सासरच्यामंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सुनिल गोंड, रामअवतार गोंड(सासरे), लिलावती गोंड(सासू), सुधीर गोंड ( दिर), गुंजन गोंड(नणंद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.