डोंबिवली – आपणास व्यवसायासाठी पैशाची खूप गरज आहे. मी तुमच्या नावावर कर्ज काढतो. ते कर्जाचे हप्ते मी नियमित वेळेत फेडतो. असे नवी मुंबईतील ऐरोली येथे राहणाऱ्या एका इसमाने डोंबिवलीतील रहिवासी असलेल्या नोकरदार महिलेला सांगितले. या महिलेची कर्जासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे घेऊन त्या आधारे इसमाने वित्तीय संस्थेतून ९३ लाख ६० हजार ४४९ रूपयांचे कर्ज काढले. त्यानंतर या कर्जातील काही रक्कम फेडून उर्वरित रक्कम फेडण्यास नकार दिला.

महिलेच्या नावे घेतलेला रकमेचा अपहार केला म्हणून महिलेने डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ८ एप्रिल २०२२ ते १६ एप्रिल २०२२ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. हा प्रकार डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील वाशी बस थांब्याजवळील मंगल सोसायटीत घडला आहे.

योगेश सुधाकर नाईक असे फसवणूक करणाऱ्या इसमाचे नाव आहे. तो नवी मुंबईतील ऐरोली येथील साईनाथ वाडीतील रखमाजी प्लाझा इमारतीत सेक्टर क्रमांक एक मध्ये राहतो, असे पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. फसवणूक झालेली महिला डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्त्यावरील अंबिका नगरमधील न्यु कस्तुरी सोसायटीत राहते. त्या नोकरी करतात.

तक्रारदार महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गुन्हा दाखल इसम याने आपणास मी सरकारी नोकर आहे. मला पैशाची खूप गरज आहे. आपण मला आपल्या कागदपत्रांचा वापर करून आपल्या नावे कर्ज काढून द्या. ते कर्ज मी वर्षभराच्या कालावधीत वेळेत फेडेन, असे आश्वासन दिले.

या महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर आणि समोरील इसम हा सरकारी नोकरदार असल्याने तो वेळेत कर्ज फेडील असे तक्रारदार महिलेला वाटले. आपण सरकारी नोकर असल्याने मला कर्ज मिळत नाही, असे त्याने महिलेला सांगितले. या इसमाने केलेल्या सूचनेप्रमाणे महिलेने स्वताची वित्तीय कंपनीत कर्ज काढण्यासाठी लागणारी बँक खाते, पॅन, आधारकार्ड, वेतनचिठ्ठी आणि इतर आवश्यक कागदपत्रे जमा करून ती वित्तीय संस्थेत जमा केली. या कागदपत्रांच्या आधारे वित्तीय संस्थेने तक्रारदार महिलेला इसमाच्या सूचनेप्रमाणे ९३ लाख ६० हजार ४४९ रूपयांचे कर्ज मंजूर केले.

कर्जाची रक्कम महिलेच्या बँक खात्यावर जमा झाल्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून ती रक्कम इसमाने आपल्या बँक खात्यावर वळती करून घेतली. रक्कम वळती करून घेतल्यानंतर इसमाने सुरूवातीला महिलेला दाखविण्यासाठी कर्ज हप्त्यामधील १२ लाख १६ हजार ८९९ रूपयांची रक्कम वित्तीय संस्थेत भरणा केली. त्यानंतर त्याने कर्जाचे हप्ते फेडण्यास टाळाटाळ सुरू केली.

कर्जाचे हप्ते चुकू लागल्याने वित्तीय संस्थेकडून महिलेला विचारणा होऊ लागली. महिला त्या इसमाला कर्जाऊ रक्कम भरण्यास सांगत होती. नंतर इसमाने कर्जाचे हप्ते फेडण्यास टाळाटाळ सुरू केली. अशाप्रकारे इसमाने ८१ लाख ४३ हजार ५५० रूपयांची रक्कम व्याजाच्या हप्त्यासहित फेडण्यास नकार दिला. नंतर तो पसार झाला. कर्जाऊ रकमेचा अपहार करून आपली फसवणूक केली म्हणून महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.