scorecardresearch

इलेक्ट्रीक दुचाकी ऑनलाईन खरेदी करणे तरुणाला पडले महागात ; ६० हजार रुपयांना फसवणूक

बनावट संकेतस्थळ तयार करून लुबाडलं ; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

(प्रातिनिधिक छायाचित्र)

इलेक्ट्रीक दुचाकी ऑनलाईन खरेदी करणे एका ३३ वर्षीय मुलाला भलतेच महाग पडले. बनावट संकेतस्थळ तयार करून एका भामट्याने या तरुणाची ६० हजार रुपयांना फस‌वणूक केली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पाचपाखाडी येथील चंदनवाडी परिसरात हा तरूण राहत असून तो वस्तू घरपोहोच करणाऱ्या एका कंपनीमध्ये कामाला आहे. गेल्याकाही दिवसांपासून तो इलेक्ट्रीक दुचाकी खरेदी करण्याच्या विचारात होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी तो घरामध्ये एकटाच बसला असताना त्याने मोबाईलवर ऑनलाईन इलेक्ट्रीक दुचाकीचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्याला एका संकेतस्थळावर एक इलेक्ट्रीक दुचाकी दिसली. त्याने तत्काळ संबंधित संकेतस्थळावर त्याच्या माहितीचा अर्ज भरला. त्यानंतर त्या तरुणाला एका मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. त्या व्यक्तीने तरूणाला दुचाकी हवी असल्यास नोंदणी रक्कम म्हणून ७ हजार १९९ रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार, संबंधित व्यक्तीने एक बँक खात्याचा क्रमांक दिला. तरुणाने या बँक खात्यात नोंदणीची रक्कम भरली. काही वेळाने त्या व्यक्तीने पुन्हा संपर्क साधून तरुणाला दुचाकी तत्काळ हवी असल्यास आणखी ४२ हजार ८०१ रुपये भरावे लागतील. असे सांगितले. त्यामुळे तरुणाने पुन्हा ४२ हजार ८०१ रुपये त्या बँक खात्यात जमा केले.

यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा तरुणाला संपर्क साधून दुचाकी एका दिवसात हवी असल्यास आणखी १० हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यामुळे तरूणाने पुन्हा १० हजार रुपये त्याच्या बँक खात्यात जमा केले. तरुणाने सायंकाळी दुचाकी केव्हा मिळेल यासाठी त्या व्यक्तीशी संपर्क साधला. परंतु त्या व्यक्तीने तरुणाचा फोन उचलला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने दुचाकीच्या शोरुममध्ये जाऊन विचारणा केली. त्यावेळी अशा पद्धतीने आम्ही कोणाकडूनही पैसे घेतले नसल्याची माहिती संबंधित शोरुमच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर २३ मार्चला तरुणाने या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A young man who bought an electric bike online was robbed of rs 60000 msr

ताज्या बातम्या