कल्याण: छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्याची उभारणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्म, जात, पंथांचा विचार करून संविधानाची निर्मिती केली. संविधानामुळे देश एकसंधतेने चालत आहे. अशा परिस्थितीत जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण करून, महागाईवरून समाजाचे लक्ष वळविण्यासाठी मनसेने भोंगे, हनुमान चालिसा विषय उकरून काढला आहे. मनसेच्या या भूमिकेला आम आदमी पक्ष चौकांमध्ये राष्ट्रगीत गाऊन प्रत्युत्तर देईल, असा इशारा आपचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी रविवारी येथे दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय सलोखा वाढविण्यासाठी आम आदमी पक्षाने हा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. आगामी कल्याण- डोंबिवली पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका हद्दीतील आपची पक्षीय ताकद वाढविण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी ‘आप’ कल्याण- डोंबिवली जिल्ह्यातर्फे मार्गदर्शन मेळाव्याचे कल्याण पश्चिमेतील शंकरराव चौकातील स्वामी नारायण मंदिर सभागृहात रविवारी आयोजन केले होते.  सर्वोच्च न्यायालयाने २०१६ मध्ये एका विशिष्ट धर्माचा उल्लेख न करता धर्मस्थळांवर जे भोंगे आहेत. त्यांच्या आवाजाची मर्यादा ७५ डेसिबलपेक्षा अधिक असता कामा नये असे म्हटले आहे. मनसेने या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून लोक, बेरोजगारांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू केले आहे. गावांमध्ये मंदिरांवर भोंगे आहेत. त्याचा मनसे विचार करत नाही. महागाईमुळे लोकांची होरपळ सुरू आहे. जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. नोकऱ्या नसल्याने तरुणांची तडफड सुरू आहे. हे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी समाजाचा, तरुणांचा बुद्धिभेद करण्याचे काम मनसेकडून सुरू आहे. त्याला तोडीसतोड उत्तर राष्ट्रगीत गाऊन दिले जाईल, असा इशारा प्रदेश सचिव शिंदे यांनी दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap recites national anthem reply to hanuman chalisa zws
First published on: 18-04-2022 at 04:38 IST