देशाचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात असते, असे म्हटले जाते आणि म्हणूनच देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सजग, सुजाण, सुसंस्कारित तरुण पिढी तयार होणे ही प्रत्येक देशाची गरज असते. शिक्षणाच्या माध्यमातून बदलत्या काळाची ही गरज लक्षात घेऊन जुन्या-नव्याचा मेळ साधत अशी पिढी घडविता येते. भारतीय संस्कृतीतून होणारे मूल्य संस्कार, जीवनविषयक शिकवण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तार्किक विचारप्रवृत्ती यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांवर संस्कार करावे लागतात.
खरे तर विविध अभ्यासक्रमांच्या, उद्योगसमूहांच्या आंतरराष्ट्रीय दर्जा असणाऱ्या शाळांच्या वाढत्या स्पर्धेला सामोरे जात मराठी शाळा सुरू ठेवणे आणि विद्यार्थी घडविणे हे खूप मोठे आव्हान आहे, पण तरीही ठाण्यातील श्रीरंग विद्यालयासारख्या निवडक शाळा निर्धारपूर्वक तसा प्रयत्न करीत आहेत.
साधारणपणे ४०-४५ वर्षांपूर्वी श्रीरंग सोसायटीही ठाण्यातील पहिली मोठी सोसायटी होती. या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी जवळ शाळा असण्याची निकड श्रीरंगकर नागरिकांना प्रकर्षांने जाणवत होती. त्यातूनच श्रीरंग सोसायटीतील मुलांसाठी शाळा काढण्याच्या उद्देशाने समविचारी रहिवासी एकत्र आले. त्यासाठी श्रीरंग एज्युकेशन ट्रस्ट ही संस्था स्थापन करण्यात आली. कागदावरील एका चांगल्या योजनेला मूर्त रूप येऊन १९७२ मध्ये मराठी शाळा सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शाळेची शैक्षणिक वाटचाल सुरू झाली. काही वर्षांतच या शाळेने ठाण्याच्या शैक्षणिक विश्वात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन १९८७ मध्ये इंग्रजी माध्यमाची शाळाही सुरू करण्यात आली. १९७२ मध्ये पहिल्या वर्षी शाळेत १५८ विद्यार्थी होते. सध्या या शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक मिळून १३०० मुले शिकत आहेत.
श्रीरंग विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेत कष्टकरी, श्रमजीवी वर्गातले विद्यार्थी मोठय़ा प्रमाणावर आहेत. एकेरी पालकत्वाची जबाबदारी पेलू पाहणारेही बरेच आहेत. या लोकांचे दैनंदिन जगणे हाच संघर्ष आहे. परिणामी सहाजिकच मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास, त्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण आणि सकस आहाराचा अभाव जाणवतो. अनेक विद्यार्थ्यांना पोटभर जेवण मिळते का? हा प्रश्न अंतर्मुख करतो. बरेचसे विद्यार्थी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी घरोघरी वर्तमानपत्र टाकतात. काहीजण गॅरेजमध्ये, बँड पथकात काम करतात. ही कामे सांभाळून ते शाळेत येतात. काही विद्यार्थी शाळेची नियमित फीसुद्धा भरू शकत नाहीत. मग त्यांच्या मदतीसाठी समाजातील काही सधन, संवेदनशील व्यक्ती पुढे येतात. त्यात काही शिक्षकही आहेत. शाळेतही अशा मुलांसाठी काही विशिष्ट उपक्रम राबविले जातात.
या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रकल्पांच्या साहाय्याने सर्व विषयांचे शिक्षण दिले जाते. इंग्रजी भाषेची धास्ती वाटू नये म्हणून इयत्ता पाचवी आणि सहावीसाठी बेसिक इंग्लिश स्पिकिंग कोर्सचा उपक्रम राबविला जातो. दर आठवडय़ाला विद्यार्थ्यांना दोन तास विनामूल्य मार्गदर्शन दिले जाते. त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलांचे संवेदनशील मन लक्षात घेता त्यांच्यासाठी संस्कार वर्ग आयोजित केले जातात.
गेली सहा वर्षे विद्यार्थ्यांना वीज बचतीचे महत्त्व कळावे म्हणून जाणीवपूर्वक एक उपक्रम राबविला जात आहे. टाटा पॉवरतर्फे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांतर्गत एनर्जी क्लब स्थापन केला जातो. शाळेचे विद्यार्थी या क्लबचे सभासद असतात. टाटाचे अधिकारी वीज बचतीचे महत्त्व पटवून देताना वीज वाचविण्याचे उपायही सांगतात. विद्यार्थी पूर्वीची बिले आणि वीज बचतीचे उपाय अमलात आणल्यावर आलेले बिल यांची तुलना करतात. कारण त्यात त्वरित फरक दिसून येतो. विद्यार्थी शाळा इमारतीची घराप्रमाणेच काळजी घेतात. शाळा सुटल्यावर संपूर्ण शाळेत फिरून नको असलेले दिवे, पंखे बंद करतात. शाळेतर्फे राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांना मुले चांगला प्रतिसाद देतात.
शाळेत इंटरअॅक्टिव्ह क्लबच्या माध्यमातून अनेकविध उपक्रम राबविले जातात. शाळेत येता-जाताना विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी म्हणून क्लबचे सदस्य स्वत: शाळेच्या गेटवर उभे राहून विद्यार्थी शिस्तीचे पालन करीत आहेत की नाही यावर लक्ष ठेवतात. अलीकडेच शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकच्या वस्तू न वापरण्याविषयी जनजागृती करण्यासाठी रॅली काढली होती. क्लबच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील इतर विद्यार्थ्यांना कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकपेढीतील पुस्तकांचे वाटपही क्लबची मुलेच करतात.
रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहानिमित्त गडकरी रंगायतन येथे मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी शहरातील सर्व शाळांमधून काही कार्यक्रम निवडण्यात आले होते. त्यात या शाळेने बसविलेल्या व्यसनमुक्तीवरील पथनाटय़ाची निवड झाली होती.
या मुलांमध्ये मोठय़ा प्रमाणावर कलागुण दिसून येतात. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शाळा सातत्याने प्रयत्नशील असते. शाळेतील विद्यार्थी ठीकठिकाणी आयोजित आंतरशालेय स्पर्धामध्ये भाग घेतात. शाळेचे स्वत:चे बँडपथक आहे. दरवर्षी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला शाळेत भव्य कार्यक्रम होतो. त्यात दोन्ही शाळांचे सर्व विभाग सहभागी होतात. महाराष्ट्राची लोकधारा, विविध भाषांमधील देशभक्तीपर गीते आदी शाळेच्या कार्यक्रमांना खूप चांगली दाद मिळाली आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी शाळेची कुंपण भिंत रंगविण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. स्वच्छता अभियान, प्रदूषण समस्या इत्यादी विषयांवर दोन्ही शा़ळेतील विद्यार्थ्यांनी काढलेली भित्तीचित्रे आजही पाहायला मिळतात. शिष्यवृत्ती स्पर्धा, विज्ञान स्पर्धा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध स्पर्धा, टिळक स्मारक विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धाना विद्यार्थ्यांना नियमितपणे बसविले जाते. मराठी भाषा दिनाचा उपक्रम, जिज्ञासाचा वाचू आनंदे, लिहू स्वच्छंदे आदी उपक्रमातही शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.
शालान्त परीक्षेत विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवावे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या एक तास आधी विनामूल्य मार्गदर्शन केले जाते. पहिल्या सत्रानंतर हुशार आणि अधिक मार्गदर्शनाची आवश्यकता असणारे अशा दोन गटांत विद्यार्थ्यांनी विभागणी केली जाते. दोन्ही गटांना विनामूल्य मार्गदर्शन केले जाते.
श्रीरंग विद्यालय, ठाणे
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2016 रोजी प्रकाशित
शाळेच्या बाकावरून : संस्कारक्षम विद्यार्थी घडविणारी शाळा
श्रीरंग सोसायटीतील मुलांसाठी शाळा काढण्याच्या उद्देशाने समविचारी रहिवासी एकत्र आले.
Written by हेमा आघारकर

First published on: 13-04-2016 at 04:49 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About shreerang vidyalaya in thane