सामान्य लोकलच्या फेऱ्या न वाढल्याने प्रवासी निराश; मार्गिका सुरू होऊनही गर्दी कायम

ठाणे : ठाणे ते दिवा दरम्यानच्या बहुप्रतीक्षित असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्याने उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ होऊन प्रवाशांना दिलासा मिळेल असा कयास बांधला जात होता. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. प्रशासनाने गुरुवारी सुधारित वेळापत्रक तयार करून काही साध्या उपनगरीय रेल्वे गाडय़ांऐवजी त्या वेळेत वातानुकूलित लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकल अक्षरश: रिकाम्या धावत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने २००८ मध्ये रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जात होता. अखेर १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

रेल्वे प्रशासनाने या रेल्वे मार्गावर सुधारित वेळापत्रक तयार करून ३६ नव्या उपनगरीय रेल्वे फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी ३४ फेऱ्या वातानुकूलित लोकलच्या आहेत. सुधारित वेळापत्रकामुळे विनावातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याचे दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाने सुधारित वेळापत्रक तयार करताना दररोज सुटणाऱ्या काही विनावातानुकूलित लोकलऐवजी त्या ठिकाणी वातानुकूलित रेल्वे सुरू केली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी आपली नेहमीची गाडी पकडण्यासाठी आलेल्या रेल्वे प्रवाशांना समोर अचानक वातानुकूलित लोकल उभी राहिली होती. या रेल्वेत अगदीच तुरळक प्रवासी होते.

अनेकांना त्यांच्या ठरावीक वेळेतील लोकलमधून प्रवास करण्याची सवय असते. कार्यालयीन वेळापत्रकानुसार प्रवासी त्यांचा दिनक्रम ठरवतात. परंतु सुधारित वेळापत्रक आणि वातानुकूलित रेल्वेगाडय़ांमुळे आता घरातून उशिराने किंवा लवकर घर सोडावे लागणार असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू झाली आहे. 

वातानुकूलित रेल्वेस थंड प्रतिसाद

मध्य रेल्वे मार्गावर यापूर्वी सुमारे दीड वर्षांपासून डोंबिवली येथून सकाळी ७.४७ वाजता मुंबईच्या दिशेने जाणारी वातानुकूलित रेल्वे सोडली जात होती. परंतु सुधारित वेळापत्रकात या वातानुकूलित रेल्वेऐवजी विनावातानुकूलित लोकल चालविण्यात येत आहे. वातानुकूलित रेल्वेस थंड प्रतिसाद असला तरी अनेकांनी गर्दी टाळण्यासाठी वातानुकूलित रेल्वेतून प्रवास करण्यासाठी मासिक पास काढून ठेवले होते. आता त्यांच्या वेळेतच रेल्वेगाडी धावत नसल्याने पास काढून उपयोग काय असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.

दररोज अंबरनाथ येथून सकाळी ११.१७ वाजता सुटणाऱ्या लोकलने मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. परंतु आता या वेळेत वातानुकूलित लोकल सुरू केली आहे. त्यामुळे कार्यालयात पोहचण्यासही उशीर होत आहे.  – सोनाली आंबेकर, प्रवासी  

प्रवासी संघटना किंवा प्रवाशांचे मत जाणून घेण्याऐवजी थेट रेल्वे प्रशासनाने सुधारित वेळापत्रक तयार केले आहे. तसेच वातानुकूलित लोकलचा सध्या प्रवाशांना फटका बसत आहे. अनेक प्रवासी त्यासंदर्भात तक्रारीही करू लागले आहेत.  – नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवसी संघटना