ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या तीन हात नाका सिग्नल परिसरात अंध आणि अपंगाना रस्ता ओलांडता यावा यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतुक पोलिसांच्या माध्यमातून सुगम्य सिग्नल यंत्रणा बसविण्यात आला आहे. पादचाऱ्यांसाठी सिग्नल सुरू झाल्यास अंधांना आवाज ऐकू जाणार आहे. त्यामुळे रस्ता ओलांडणे त्यांना सोपे होणार आहे. तर अपंगांसाठी देखील येथे पदपथ बनिवण्यात आले आहेत. या सुगम्य सिग्नलचे उद्घाटन सोमवारी झाले. अंध- अपगांनी या सुगम्य सिग्नलबाबत समाधान व्यक्त केले.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका चौक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच चौकातून मुलुंड, वागळे इस्टेट, नौपाडा, हरिनिवास, घोडबंदरच्या दिशेने वाहनांची वाहतुक होत असते. त्यामुळे दिवसाला हजारो हलकी आणि जड वाहने या मार्गावरून वाहतुक करतात. तीन हात नाका भागात रहिवासी आणि वाणिज्य क्षेत्र आहे. त्यामुळे सिग्नल परिसरातून पादचाऱ्यांचीही वर्दळ अधिक असते. यात अंध आणि अपंग व्यक्तिंचाही सामावेश असतो. तीन हात नाका हा सिग्नल ठाण्यातील सर्वात मोठ्या सिग्नलपैकी एक आहे. रस्ता ओलांडत असताना अंध आणि अपंगांना बहुतांशवेळा इतरांचा आधार घ्यावा लागतो. या प्रकारामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी ठाणे महापालिका आणि ठाणे वाहतुक पोलिसांच्या माध्यमातून याठिकाणी आता अंध आणि अपंगांसाठी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेला सुगम्य सिग्लन असे नाव देण्यात आले आहे.
सोमवारी या सुगम्य सिग्नलचे उद्घाटन वाहतुक पोलीस आणि अंध,अपंग व्यक्तींकडून करण्यात आले. त्यांनी या सिग्नलबाबत समाधान व्यक्त केले. सिग्नल सुरू झाल्याने अपंग किंवा अंध व्यक्तींना रस्ता ओलांडत असताना विशिष्ट आवाज ऐकू येणार आहे. तसेच अपंग व्यक्ती आणि पायांच्या स्नायूचे किंवा पायांचे इतर आजार असलेल्या व्यक्तींना रस्ता ओलांडता यावा यासाठी पदपथ तयार करुन चढ-उतार असलेला भागही केला आहे. त्यामुळे अंध अपंगांसह इतर वृद्ध पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तीन हात नाका सिग्नल परिसर हा ठाण्यातील सर्वाधिक रहदारीचा चौक आहे. या सिग्नलमुळे आम्हाला दिलासा मिळाल आहे. अशाचप्रकारे ठाण्यातील इतर भागातील सिग्नल क्षेत्रात अशा सुविधा उपलब्ध केल्या जाव्यात असे एका अपंग व्यक्तीने सांगितले.