ठाणे : मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पंधरा वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला असता तर, पालिकेचे साडेतीन हजार कोटी रुपये वाचण्याबरोबरच अपघातामध्ये गेलेले बळी वाचले असते, असा दावा करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. करोना काळामध्ये सहाशे रुपयांची शव पिशवी सहा हजार रुपयांना कुणी विकली, असा प्रश्न उपस्थित करत सत्य लोकांना कळण्यासाठी ‘दुध का दुध, पाणी का पाणी’ झाले पाहिजे असेही ते म्हणाले.

ठाणे शहरात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यानिमित्ताने ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पुढच्या दोन आणि तीन वर्षांमध्ये मुंबई महापालिका खड्डेमुक्त होईल. ठाणे शहरही खड्डेमुक्त करायचे आहे. खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी धाडस लागते आणि आम्ही ते दाखविण्याचे काम केले. या कामांसाठी महापालिकेच्या मुदत ठेवीचे पैसे वापरल्याची ओरड होत आहे. परंतु चित्र तसे नाही. आमचे सरकार आले, त्यावेळेस ७७ हजार कोटींच्या मुदत ठेवी होत्या. त्यात ११ हजार कोटींनी वाढ होऊन ठेवींचा आकडा ८८ हजार कोटी इतका झाला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा – भातसा नदीपात्रात एकाचा बुडून मृत्यू

चौकशी होणार म्हणून आता मोर्चा काढणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस परदेशी गुंतवणूकीत राज्य प्रथम क्रमांकावर होते. महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यावेळी पहिल्यावर्षी गुजरात तर, दुसऱ्यावर्षी कर्नाटक प्रथम क्रमांकावर होते. त्यानंतर आपले सरकार आल्यावर परदेशी गुंतवणुकीत राज्य पुन्हा पहिल्या क्रमांकावर आले. राज्यात एक लाख १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. केंद्रात आणि राज्यात समविचारी पक्षांचे सरकार असते, तेव्हाच गुंतवणूकदार विश्वास ठेवून अशी गुंतवणूक करतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सुरू झालेल्या पावसाने आपला आनंद द्विगुणीत केला आहे. बळीराजा शेतकरी हा आपला मायबाप असून अन्नदाता आहे. त्याच्यावर कुठले संकट येऊ नये म्हणून आपण नेहमी साकडे घालतो. त्यामुळे पाऊस चांगला होईल आणि लांबलेला पाऊस पूर्ण कोटा भरून काढेल, असेही ते म्हणाले. पंढरीच्या वारीसाठी टोल माफ तसेच जास्त बसगाड्या सोडण्याबरोबरच १५ लाख वारकऱ्यांचा एक लाखांचा विमा उतरविण्यात आला आहे. यंदा पांडुरंगाची पूजा होईल, तेव्हा दर्शन बंद राहणार नाही. मुखदर्शनपण चालूच राहणार आहे, असेही ते म्हणाले. ज्या शहरांचे रस्ते मोठे, त्या शहरांचा विकास होतो. त्यामुळेच समृद्धी महामार्ग, घाटकोपर ते घोडबंदर फ्री वे, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग तसेच इतर प्रकल्प राबविले जात आहेत. जे अधिकारी चांगले काम करतील, त्यांचा सत्कार केला जाईल. पण, जे काम करणार नाहीत, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी पुन्हा दिला.

हेही वाचा – पहिल्याच पावसात शिळफाटा रस्त्यावर वाहन कोंडी

घोडबंदरला वाढीव पाणी

एमएमआरडीएच्या देरर्जी प्रकल्पातील पाणी पालघरच्या प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पातून घोडबंदर विभागाला २०० दशलक्षलीटर इतके पाणी मिळावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रमात बोलताना केली. त्यावर घोडबंदरच्या वाढीव पाणयासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. या भागाला वाढीव पाणी मिळत असेल तर नक्की देण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच घोडबंदरच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी अमृत योजनेमधून ३२३ कोटी रुपये मिळाले आहेत, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्यातील पोखरण रस्ता क्रमांक. २ येथील ज्येष्ठ कवी, साहित्यिक स्व. बाबुराव मारुतीराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर आणि महामानव शिव, शाहू, फुले, आंबेडकर स्मृती सभागृहाचे लोकार्पण, पोखरण रस्ता क्रमांक. २ येथील कै.सिंधूताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, कासारवडवली, घोडबंदर रोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावरील आदिवासी विद्यार्थी वसतीगृह, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व डिजीटल ॲक्वेरियम या प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.