कल्याण- महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागातील मोहने येथे घरांमध्ये महावितरणच्या खांबांवरुन जिवंत वीज वाहिनीतून चोरटी वीज घेणाऱ्या वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यात मोहने येथे १४९ वीज चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ४१ लाख ५७ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे.

हेही वाचा >>> बदलापूरः वांगणी ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच; शिवसेनेच्या शिंदे गटात फुट, महाविकास आघाडी निष्प्रभ

मोहने, आंबिवली परिसरातील वाढती वीज चोरी विचारात घेऊन या भागात नियमित वीज चोरांविरुध्द कारवाई करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. मोहने वीजवाहिनी क्रमांक सातव्दारे वडवली, अटाळी, आंबिवली, नवनाथ नगर, संतोषीमाता तसेच आंबिवली स्टेशन या परिसरास वीज पुरवठा केला जातो. कल्याण पश्चिम विभागात या वाहिनीवरुन सर्वाधिक वीज चोरी होत असल्याची माहिती महावितरणला मिळाली होती. ही वीजहानी कमी करण्यासाठी उच्चदाब व लघुदाब तारा बदलणे, खांबांवरील अतिरिक्त सेवा तारा काढणे, निकामी मीटर बदलणे आणि वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्याच्या उपाययोजना सुरू आहेत.

हेही वाचा >>> बदलापूरः बारवी प्रकल्पग्रस्तांना अखेर मिळाले नोकऱ्यांचे नियुक्तीपत्र; प्रकल्पग्रस्त तरूणांना अभियंत्यांसह ‘या’ पदांवर संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या दीड महिन्यात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार १३९ वीज चोरांवर कारवाई करून ४१ लाख ५७ हजार ८७० रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. संबंधितांना चोरीच्या विजेचे देयक देण्यात आले आहे. विहित मुदतीत वीजचोरीच्या देयकाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात येईल. घरात मीटरच्या इनकमिंग वायरला जॉईंट असणे, मिटर बायपास करणे, मिटरचे एम-सिल तोडणे, मिटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता दीगंबर राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे. वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा व सुलभ पद्धतीने उपलब्ध असलेली अधिकृत वीजजोडणी घेऊन वीजवापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.