पादचाऱ्यांना दिलासा फेरीवाल्यांना नगरसेवक, भाईंचा आशीर्वाद असल्याचा आरोप
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांवर महापालिका पथकाने मंगळवारी सकाळी कारवाई केली. त्यामुळे रेल्वे स्थानकात जाणारे प्रवासी समाधान व्यक्त करत होते. ही कारवाई महापालिकेने अशाच प्रकारे सुरू ठेवावी, अशी मागणी पादचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
रेल्वे स्थानकात प्रवेश करतानाच रेल्वे न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर दोन ते तीन सरबत विक्रेते मुख्य प्रवेशद्वार अडवून अनेक वर्षे व्यवसाय करीत आहेत. ‘आम्ही रेल्वे पोलीस, पालिका कर्मचाऱ्यांना वेळोवेळी हप्ते देतो. त्यामुळे आम्हाला कोणी काही करू शकत नाही,’ अशी उघड कबुली आणि गुर्मीची भाषा हे सरबत विक्रेते प्रवाशांना करीत असतात. काही प्रवासी सरबत विक्रेत्यांना प्रवेशद्वारे अडवून व्यवसाय करु नकोस, अशी विनवणी करतात. तरीही हे फेरीवाले कुणालाही दाद देत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.
कल्याण पश्चिम, पूर्व भागातील स्कायवॉकवर फेरीवाले ठाण मांडून बसलेले असतात. रेल्वे पोलिसांनी स्कायवॉकवर सतत राबता ठेवल्यामुळे रेल्वे हद्दीत फेरीवाले बसणे बंद झाले आहे. त्यामुळे सगळे फेरीवाले महापालिका हद्दीतील स्कायवॉकवर ठाण मांडून व्यवसाय करीत आहेत. महालक्ष्मी हॉटेलसमोरील पदपथावर टपऱ्या, कपडय़ाची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. या दुकानचालकांबरोबर महापालिकेच्या फेरीवाला हटाव पथकातील काही कर्मचाऱ्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने पदपथ अडविणाऱ्या या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत नसल्याचे समजते. दीपक हॉटेल, पुष्कराज हॉटेल ते शिवाजी चौक परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा, रस्ते अडवून सकाळ, संध्याकाळ फेरीवाले बसत आहेत. या फेरीवाल्यांवर सकाळ, संध्याकाळ नियमित कारवाई केली तर या भागातील फेरीवाल्यांचे उच्चाटन करणे शक्य होणार आहे. काही माजी नगरसेवक, दादा, भाई या फेरीवाल्यांना आश्रय देत असल्याने फेरीवाले रस्ते अडवत असल्याचे समजते.
महापौर, आयुक्त रिंगणात
भाजपचे आमदार नरेंद्र पवार मागील आठ महिन्यांपासून कल्याण रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांवर कारवाई करावी म्हणून रेल्वे, पालिका, वाहतूक, आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. आमदारांनी बैठक घेतली की तेवढय़ा वेळेपुरते पालिकेकडून वाहतूक, आरटीओ विभागाकडून बेकायदा रिक्षांवर कारवाई केली जाते. आमदारांपाठोपाठ महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन फेरीवाल्यांना हटविण्याच्या लढाईत उतरले आहेत.

‘ग प्रभागाकडेही लक्ष द्या’
फ प्रभागाने फेरीवाल्यांना हटविण्याची जोरदार मोहीम पथक प्रमुख संजय कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आहे. परंतु, ग प्रभागात मात्र फारशी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या परिसरात फेरीवाले रस्ते, पदपथ अडवून सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत बसलेले असतात. आयुक्त रवींद्रन यांचे आदेशही ग प्रभागाकडून गुंडाळून ठेवण्यात येत आहेत. कामत मेडिकलसमोरील पदपथावरील फेरीवाले आपल्या जागा सोडण्यास तयार नाहीत. ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकात टिटवाळा, कल्याणमधील कर्मचारी तैनात केले तरच या भागातील फेरीवाले हटवले जातील, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.