भिवंडी, कल्याण, ठाण्यातील छाप्यात दोन कोटींचा रेतीसाठा जप्त

ठाणे जिल्ह्य़ातील खाडीकिनाऱ्यांवर होणाऱ्या अवैध रेती उपशावर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जोरदार कारवाई सुरू असून गुरुवारी सुट्टीच्या दिवशी धडक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे दुपारी झालेल्या कारवाईमध्ये जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बोटीने खाडी पात्रात धाड टाकून कारवाई केली. त्यामुळे सुट्टीचा मुहूर्त साधून अवैध रेतीउपसा करण्यासाठी सरसावलेल्या रेतीमाफियांना चांगलाच दणका बसला.

भिवंडी, कल्याण आणि ठाणे या ठिकाणी एकाच वेळी झालेल्या कारवाईमुळे बेसावध रेती उपसा करणाऱ्यांकडून दंडाची वसुली आणि मालमत्ता असे २ कोटी ३ लाखांची कारवाई करण्यात आली. ठाण्याच्या गायमुख, मुंब्रा व घोडबंदर, नवी मुंबई, साबे येथे पथकाने ७४ ब्रास वाळूसाठा (५.१८ लाख) त्याचप्रमाणे ६ सक्शन पंप (३० हजार) जप्त करण्यात आले. या वेळी ३१ वाहनांकडून ५.६७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय अंबरनाथ, मुरबाड, शहापूर येथेही दक्षता पथकांनी कारवाई केली. भिवंडीच्या कशेळी, काल्हेर बंदरांवर पथकाने केलेल्या कारवाईत ५३१ ब्रास वाळूसाठा (३७.१७ लाख) त्याचप्रमाणे ५ सक्शन पंप (२० लाख) जप्त करण्यात आले. या वेळी ३९ वाहनांकडून ८.३५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तर कल्याण रेतीबंदर येथे तहसीलदार किरण सुरवसे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत ४८ लाखांच्या ४ क्रेन्स, ३५  लाखांचे ७ सक्शन पंप्स, याशिवाय २५ हजार रुपयांचे ५ रेती धुण्याचे पाइप्स जप्त केले. याशिवाय गौण खनिज अवैधरीत्या वाहून नेणाऱ्या ३२ वाहनांकडून १० लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल केला.