कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ परिसरातील अनेक शैक्षणिक संस्था खासगी बसद्वारे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहेत; परंतु ही बस वाहतूक नियमबाह्य़ होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने  उपप्रादेशिक परिवहन कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा नियमबाह्य़ वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत गेल्या २५ दिवसांत ७५० वाहने तपासणी करून त्यांच्याकडून ३ लाख ७४ हजारांचा दंड अधिकाऱ्यांनी वसूल केला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली. कारवाईत गांधीनगर भागातील गार्डियन शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी खासगी बसही अधिकाऱ्यांनी जप्त केली.

शालेय बस पिवळ्या रंगाची असावी. त्या बसमध्ये प्रथमोपचार पेटी, एक साहाय्यक, महिला साहाय्यक असावेत. तसेच अग्निशमन यंत्रणा, वेग नियंत्रकाची (स्पीड गव्हर्नर) सुविधा असावी, असे काही नियम करण्यात आले आहेत. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शासनाबरोबर उच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिले आहेत. या नियमांची अंमलबजावणी होते आहे किंवा नाही ते पाहण्यासाठी कल्याण परिवहन क्षेत्रातील शालेय बसगाडय़ांची नियमित तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

बुधवारी सकाळी मोटार वाहन निरीक्षक अजय कराळे, प्रशांत शिंदे, प्रवीण कोटकर यांचे पथक डोंबिवलीत मुख्य रस्त्यांवर तपासणी सुरू असताना गार्डियन शाळेच्या विद्यार्थ्यांची नियमबाह्य़ वाहतूक करणारी एक खासगी बस तपासणीत अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकली. ही बस जप्त करून तातडीने ‘आरटीओ’ कार्यालयात जमा करण्यात आली, असे अजय कराळे यांनी सांगितले.   पालकांना शालेय बस, वाहनांबाबत काही गैर वाटत असेल तर त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन नाईक यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपासणी मोहीम १ जुलै ते २६ जुलै २०१६

  • आरटीओ क्षेत्रातील ७५० वाहनांची तपासणी
  • १२८ वाहने दोषी
  • ५० वाहने जप्त
  • ६१ वाहनांवर दंडात्मक कारवाई (निकाली)
  • २४ हजार ६४५ रुपयांचा कर वसूल
  • ३ लाख ४९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल