डोंबिवली – डोंबिवली जवळील दावडी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या सुमारे पाच गुंठे क्षेत्राच्या जमिनीवर भूमाफियांनी पाच वर्षापूर्वी आठ माळ्याची बेकायदा इमारत उभारली. या जमिनीवर आपला कब्जे हक्क दाखवून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांना भूमाफिया या जमिनीवर पाऊल ठेऊन देत नव्हते. ‘लोकसत्ता’ने यासंदर्भातचे वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासन, शासन यंत्रणेने ही इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी पालिकेच्या आय प्रभागाने शक्तिमान कापकाम यंत्राने सकाळपासून तनिष्का रेसिडेन्सी ही बेकायदा इमारत भुईसपाट करण्यास प्रारंभ केला.
शिळफाटा रस्त्यावरील दावडी गाव हद्दीत व्यंकटेश पेट्रोल पंप मागे, सेंट जाॅन शाळेसमोर ललित महाजन आणि इतर भूमाफियांनी या आठ माळ्याच्या तनिष्का रेसिडेन्सी बेकायदा इमारतीचे बांधकाम केले होते. या जमिनीच्या महसुली कागदपत्रांवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, भिमराव आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे यांची नावे आहेत. मागील चार वर्षापासून रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे यांनी पालिका, शासनाकडे तक्रारी करून भूमाफियांच्या तावडीतून ही जमीन मुक्त करण्याची मागणी केली होती. पालिकेच्या आय प्रभागाने दोन वेळा या बेकायदा इमारतीवर कारवाई लावली होती. माफियांच्या दहशतीमुळे कारवाईत अडथळे येत होते. भूमाफियांची स्थानिक पातळीवर दहशत असल्याने या जमिनीचा ताबा घेण्यात वारसांना अडथळा येत होता.
गेल्या आठवड्यात ‘लोकसत्ता’ने ‘डाॅ. आंबेडकर यांच्या वारसांच्या जमिनीवर भूमाफियांचा कब्जा’ असे वृत्त देताच, पालिका यंत्रणा खडबडून जागी झाली. साहाय्यक आयुक्त पवार यांच्या मागणीवरून उपायुक्त अतुल झेंडे यांनी पोलीस बळ उपलब्ध करून दिले.
मंगळवारी सकाळी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या उपस्थितीत साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी पोलीस बंदोबस्तात तोडकाम पथकाच्या साहाय्याने तनिष्का रेसिडेन्सी बेकायदा इमारत शक्तिमान कापकाम यंत्राच्या साहाय्याने भुईसपाट करण्यास सुरूवात केली. पालिकेच्या ताफ्यात दाखल झालेल्या १२ माळ्यापर्यंत तोडकाम करणाऱ्या शक्तिमान कापकाम यंत्राचा शुभारंभ या बेकायदा इमारतीपासून करण्यात आला.
डाॅ. आंबेडकर यांच्या वारसांच्या जमिनीवर ललित महाजन आणि इतरांनी इमारतीचे अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण आजपासून शक्तिमान कापकाम यंत्राने तोडण्यास सुरूवात केली. दोन दिवसात ही इमारत जमीनदोस्त होईल. – अवधूत तावडे, उपायुक्त.
ही बेकायदा इमारत अनधिकृत घोषित केली होती. दोन वेळा तोडकामाची कारवाई प्रस्तावित केली होती. याप्रकरणी एमआरटीपीचे गुन्हे दाखल आहेत. – भारत पवार, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग.
आम्ही चार वर्षापासून या इमारत प्रकरणी पालिकेकडे पाठपुरावा करत होतोच, पण ‘लोकसत्ता’ वृत्तपत्रामध्ये यासंदर्भातचे वृत्त प्रसिद्ध झाले. या बातमीची गंभीर दखल शासन, पालिकेने घेतली आणि आम्हाला न्याय मिळाला. या कारवाईबद्दल रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. – आनंद नवसागरे, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन सेना, कल्याण डोंबिवली.