डोंबिवली – डोंबिवली जवळील दावडी येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसाची जमीन आहे. ही जमीन स्थानिक भूमाफियांनी हडप करून त्या जमिनीवर सात माळ्याची तनिष्का रेसिडेन्सी ही बेकायदा इमारत उभारली आहे. भूमाफियांनी बळकावलेली जमीन आंबेडकरांच्या वारसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना भूमाफियांच्या दहशतीला सामोरे जावे लागले. ‘लोकसत्ता’ने यासंदर्भातचे वृत्त शुक्रवारी प्रसिध्द करताच, शासन, पालिका प्रशासनात मोठ्या हालाचील होऊन कल्याण डोंबिवली पालिकेच्या आय प्रभागाने ही बेकायदा इमारत येत्या मंगळवारी (ता. २०) रोजी जमीनदोस्त करण्याची जोरदार तयारी केली आहे.
डोंबिवली जवळील दावडी येथे व्यंकटेश पेट्रोल पंपाच्या मागे, सेंट जाॅन शाळेच्या समोरील जागेत ललित महाजन आणि इतर भूमाफियांनी तनिष्का रेसिडेन्सी नावाने आठ माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस चिरंजीव यशवंत भिमराव आंबेडकर यांच्या नावे असलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर डाॅ. बाबासाहेबांचे नातू ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भिमराव आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे यांची नावे आहेत.
डाॅ. आंबेडकर यांच्या वंशजाची जमीन भूमाफियांनी हडप केल्याचे लोकसत्तामधील ऑनलाईन, छापील वृत्त वाचून राज्यातील आंबेडकरी नागरिकांसह इतर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. पालिकेच्या आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून दावडी येथील डाॅ. आंबेडकर यांच्या वारसांच्या जमिनीवर कब्जा करून बेकायदा इमारत उभारणाऱ्या ललित महाजन आणि इतरांना कारवाईची नोटीस बजावली. येत्या मंगळवारी (ता. २०) पोलीस बंदोबस्त जमीनदोस्त करण्याची कारवाई लावण्यात आली आहे, असे साहाय्यक आयुक्त पवार यांनी भूमाफियांना कळविले आहे.
या तोडकामावरील बंदोबस्तासाठी आवश्यक पोलीस बळ उपलब्ध करून देण्याची मागणी पालिकेने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे केली आहे. पालिकेच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या शक्तिमान कापकाम यंत्राच्या साहाय्याने ही इमारत मंगळवारी भुईसपाट केली जाणार आहे. या बेकायदा इमारतीवर कारवाई करावी म्हणून रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष आनंद बाबुराव नवसागरे दोन वर्षापासून शासन, पालिकेकडे पाठपुरावा करत होते. भूमाफियांची स्थानिक भागात प्रचंड दहशत असल्याने रिपब्लिकन कार्यकर्ते अस्वस्थ होते. पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने पालिकेला दोन वेळा ही इमारत तोडता आली नाही. तनिष्का रेसिडेन्सीवर कारवाई होणार असल्याने भूमाफियांची गाळण उडाली आहे.
दावडी येथील तनिष्का रेसिडेन्सी इमारत भुईसपाट करण्याचा कार्यक्रम येत्या मंगळवारी लावला आहे. पोलिसांनी त्या दिवशी पुरेसा पोलीस बंदोबस्त दिला तर शक्तिमान कापकाम यंत्राने ही इमारत काही तासात जमीनदोस्त करू टाकू.- भारत पवार, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग.
दावडी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांची जमीन वारसांच्या ताब्यात देण्यात यावी. या जमिनीवर उभारलेल्या बेकायदा इमारतीवर कारवाई करावी म्हणून मी दोन वर्षापासून शासन, पालिकेत प्रयत्नशील होतो. या इमारतीवर आता कारवाई होणार असल्याने आम्हाला न्याय मिळेल.–आनंद नवसागरे,रिपब्लिकन सेना, जिल्हाध्यक्ष, कल्याण-डोंबिवली