ठाणे : शहरातील म्युझ फाऊंडेशनच्यावतीने गेले ९ वर्षांपासून होत असलेल्या मासिका महोत्सवाचे क्रियाकलाप पुस्तक तयार करण्यात आले असून या पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाईनच्या माध्यमातून देशभरात करण्यात आले आहे. या पुस्तकात मासिक महोत्सवाची माहिती, त्याअंतर्गत घेण्यात येणारे उपक्रम तसेच मासिका महोत्सवासोबत जोडलेल्या संस्थांची माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकामुळे नागरिकांना मासिका महोत्सवाविषयी अधिक माहिती मिळणार असून एकप्रकारे मासिक पाळी बाबत जनजागृती होण्यास मदत होईल,असे म्युझ संस्थेचे निशांत बंगेरा यांनी सांगितले.
ठाण्यातील म्युझ फाऊंडेशन मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी गेले अनेक वर्षांपासून काम करत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचता यावे यासाठी या फाऊंडेशन गेले काही वर्षांपासून मासिका महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी, हा महोत्सव २१ मे ते २८ मे असे आठ दिवस साजरा केला जात होता. परंतू, या महोत्सवाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून आयोजकांनी यंदाच्या वर्षी डिसेंबर २०२४ पासून ते २८ मे असे सहा महिन्यांच्या कालावधीत मासिका महोत्सव साजरा केला. यंदा या महोत्सवाचे ०९ वे वर्षे होते. या महोत्सवात कलात्मक कार्यक्रम आणि खेळांच्या माध्यमातून समाजात मासिक पाळीबद्दल खुले आणि प्रामाणिक संभाषण घडवून आणले.
या महोत्सवानिमित्त यंदाच्या वर्षी आयोजकांनी मासिक पाळी विषयावर मासिका महोत्सवाचे क्रियाकलाप पुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक इंग्रजी भाषेत असून विविध राज्यात तसेच देशात याचे प्रकाशन झाले आहे. हे पुस्तक ४० पानांचे असून त्या मासिका महोत्सवा संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकाची ई-कॉपी पीएफ स्वरुपात नागिरकांमध्ये प्रसारित करण्यात आली असून या पुस्तकामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होणार आहे.
मासिका महोत्सव क्रियाकल्प पुस्तक या गोष्टींचा समावेश
या पुस्तकात मसिका महोत्सवाच्या माहितीसह या महोत्सवामुळे समाजात झालेले सकारात्मक परिणाम स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच महोत्सवात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती, खेळांची माहिती, कलात्मक उपक्रम, मासिक पाळीची माहिती आणि या महोत्सवात जोडल्या गेलेल्या देश तसेच विदेशातील विविध संस्थांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.