डोंबिवली – ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी शुक्रवारी सकाळी डोंबिवलीतील एका कार्यक्रमासाठी मुंबईतून डोंबिवलीत रस्ते मार्गाने आल्या. मुंबई ते डोंबिवली या दीड तासाच्या प्रवासाठी अभिनेत्री हिमानी यांना खड्डे, वाहतूक कोंडीमुळे तीन तासाचा प्रवास करावा लागला. डोंबिवलीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या वाहनाची खड्ड्यांमुळे झालेली आदळआपट पाहून हिमानी शिवपुरी यांनी या खड्डेमय रस्त्यांवरून रिक्षेतून प्रवास केला तर शरीराचा आकार आणि ढाचा पण बदलण्यास वेळ लागणार नाही, अशी खंत व्यक्त केली.

काही वर्षापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री दिवंंगत मनोहर पर्रीकर डोंबिवलीत एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना एमआयडीसी भागातून डोंंबिवलीत प्रवेश करताना प्रवेशव्दारावर कचऱ्याचे ढीग दिसले होते. हे ढीग पाहून त्यांनी डोंबिवली शहरे स्मार्ट सिटी वगैरे नंतर करा, पण पहिले शहराच्या प्रवेशद्वारावरील कचऱ्याचे ढीग उचलून शहर स्वच्छ सुंदर राहील, याची काळजी घ्या असा सल्ला दिला होता. अशाच एका कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी डोंबिवलीत आले होते. त्यावेळी त्यांनीही डोंबिवली घाणेरडे शहर असल्याची टीपणी केली होती. आता त्यात अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.

अभिनयाचे प्रशिक्षण देणाऱ्या डोंबिवलीतील वेध अकॅडेमी, मधुमालती एन्टरप्रायझेस यांनी अभिनेत्री हिमानी यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमस्थळी येण्यास उशीर झाल्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अभिनेत्री हिमानी व्यक्त झाल्या. त्या म्हणाल्या, मुंबई ते डोंबिवली एक ते दीड तासाच्या अंतरासाठी तीन तास लागतात. असा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे किती हाल होत असतील. एकदा रस्ता बनविला, खड्डे भरले की ते पहिल्या पावसात वाहून जातात हे गणितच मला कळत नाही. हे रस्ते बनविण्याची पद्धत तरी काय आहे. अशा खड्डे असलेल्या रस्त्यांवरून डोंबिलीतून रिक्षेने प्रवास केला तर खड्ड्यांच्या आदळआपटीमध्ये रिक्षेतील प्रवाशाच्या शरीराचा ढाचाच बदलून जाईल. स्थानिक प्रशासनाकडे पुरेसा निधी असतो, पण चांगले काही करावे अशी मानसिकता नसल्याने ही अशी परिस्थिती निर्माण होते, अशी खंत हिमानी यांनी व्यक्त केली.

मुंबई देशाच्या आर्थिक राजधानीचे केंद्र. या शहरात प्रवेश करतानाच प्रसन्न वाटते. हे शहर आपल्याला कुशीत ओढून घेते की काय असे काही क्षण वाटते. या शहराने आपणास भरपूर काही दिले. या शहरासह लगतची उपनगरे मात्र घाणेरडी कशी, असा प्रश्न पडतो. सरकारकडे अशा कामांसाठी पुरेसा निधी असतो. मग तो चांगल्या पद्धतीने खर्च करून आपले शहर स्वच्छ, सुंदर राहिल यासाठी प्रयत्न का केले जात नाहीत, असा प्रश्न अभिनेत्री यांनी हिमानी यांनी केला.

डोंबिवलीतील कार्यक्रमात हिमानी यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. डेहराडून येथील बालपण. अमेरिकेची शिष्यवृत्ती नाकारून एन. एस.डी.मध्ये प्रवेश. घरातून त्यावर आलेल्या प्रतिक्रिया, अनेक सहकलाकारांसोबतच्या आठवणींचा पट त्यांनी उलगडला.