बदलापूरः एका अपघातग्रस्त व्यक्तीच्या शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या मृत्यूप्रकरणी बदलापुरातील सह्याद्री रूग्णालयावर आरोप होत असतानाच, राज्य आरोग्य विभागाच्या सह संचालकांच्या पत्राचा चुकीचा अर्थ काढून रूग्णालयाची बदनामी केली जात असल्याचा दावा रूग्णालय प्रशासनाने केला आहे. रूग्णाच्या शस्त्रक्रियेवेळी आम्ही योग्य काळजी घेऊनच प्रक्रिया केली. याप्रकरणी अहवालात जे असेल ते आम्ही मान्य करू असेही या रूग्णालयाचे प्रमुख डॉ. योगेश मिंढे यांनी सांगितले आहे. तर याप्रकरणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई केली जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी सांगितले आहे. याप्रकरणी आरोग्य सेवा संचालनालयाने नवे पत्र जारी करून खुलासा केला आहे.
२८ नोव्हेंबर २०२४ रोजी बदलापुरात एक ३४ वर्षीय तरूणाचा अपघात झाला. त्यानंतर त्या तरूणाला सह्याद्री रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी रूग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रूग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक केला. तर निर्भया सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा संगिता चेंदवणकर आणि दयावान संघटनेचे अविनाश सोनावणे यांनी याची तक्रार आरोग्य संचालकांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी अहवालानुसार राज्य आरोग्य सहसंचालकांनी याप्रकरणी रूग्णालयावर कारवाई करत डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याचा आदेश दिल्याची माहिती तक्रारदार संगिता चेंदवणकर यांनी दिली होती.
मात्र राज्य आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या पत्राचा चुकीचा अर्थ लावत समाज माध्यमांवर रूग्णालयाची बदनामी केली जात असून हे षडयंत्र आहे, असा दावा सह्याद्री रूग्णालयाचे प्रमुख डॉ. योगेश मिंढे यांनी लोकसत्ताशी बोलताना केला. माहिती अधिकार अर्ज करणाऱ्यांनी आरोग्य सेवा आयुक्तलयाच्या सहसंचालिका डॉ. सुनिता गोल्हाईत यांच्या पत्राचा दाखला देत रूग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबतचा दावा चुकीचा आहे. याबाबत आम्ही सहसंचालकांशी चर्चा केली आहे. याप्रकरणात जी काही चौकशी केली आहे त्यातील निरिक्षणानुसार आम्ही दोषी असल्यास आम्ही कारवाईला सामोरे जावू. मात्र सध्या चुकीच्या पद्धतीने बदनामीसाठी प्रकार सुरू असल्याचेही डॉ. मिंढे यांनी सांगितले.
रूग्ण दगावल्याचा आम्हालाही दुखः आहे. आम्ही त्या रूग्णाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र तो रूग्ण वाचू शकलेला नाही. शस्त्रक्रियेपूर्वीच रूग्णाला कार्डियक अरेस्ट आला. त्यानंतरही आम्ही प्रयत्न केले त्याला अतिदक्षता विभागात आम्ही दाखलही केले. येथील भूलतज्ज्ञ अतिशय अनुभवी असून त्यांना दीड हजारपेक्षा अधिक शस्त्रक्रियांचा अनुभव आहे. मी या रूग्णालयाचा व्यवस्थापकीय संचालक आहे. मात्र रूग्णालयाविरूद्ध बदनामी केली जाते आहे. आम्ही अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया येथे यशस्विरित्या केल्या आहेत. या परिसरातील हे नामांकीत रूग्णालय आहे. त्यामुळे चुकांची काही शक्यताच नाही, असेही डॉ. योगेश मिंढे यांनी सांगितले.
सह संचालकांचे नवे पत्र
या प्रकरणातील २३ जुलैच्या पत्रात सह्याद्री हॉस्पीटल व धनलक्ष्मी हॉस्पिटलचे मालक डॉ. योगेश मिंडे, डॉ. विकास कांबळे, यांचे हॉस्पीटलचा परवाना रद्द करुन दोन्ही हॉस्पीटल त्वरीत बंद करुन सदर डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करुन दोन्ही हॉस्पीटल बंद करुन डॉक्टरांवर कारवाई करुन गुन्हा दाखल करणेबाबत असा अहवालात नमुद केल्याप्रमाणे लिहिण्यात आला होता. त्याऐवजी सह्याद्री हॉस्पीटल व धनलक्ष्मी हॉस्पीटल, कुळगाव बदलापूर या रुग्णालयांवर चौकशी समितीच्या निरिक्षणांनुसार कार्यवाही करणेबाबत असे वाचण्यात यावे. असे पत्र आम्हाला सह संचालकांनी ३० जुलै रोजी जारी केले असा खुलासा डॉ. योगेश मिंढे यांनी केला आहे.
प्रतिक्रियाः याप्रकरणी सहसंचालकांनी दिलेला चौकशी समिती अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र जारी झालेल्या पत्रानुसार चौकशी समितीचा जो अहवाल असेल त्यातील निरिक्षणानुसार आम्ही योग्य ती कारवाई नक्कीच करू. – डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.