ठाणे : जिल्ह्यातील खाडीत बेकायदा रेती उपसा करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाकडून मागील आठवड्यातच कारवाई केली असतानाच, अशाचप्रकारे रविवारी मुंब्रा खाडीत रेती उत्खनन करणाऱ्या रेतीमाफियांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत रेती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात आलेले बार्ज आणि संक्शन पंप खाडीमध्येच बुडवून नष्ट केले. नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ५० लाख रुपये इतकी आहे.

ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात खाडी परिसर लाभला आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली शहरातून ही खाडी जाते. या शहरातील खाडी पात्रातून यापुर्वी डुबी पद्धतीने रेती उपसा केला जात होता. परंतू, आता डुबी रेती उपसा पद्धत बंद झाली असून आता संक्शन पंपाद्वारे बेकायदा रेती उपसा करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यामुळे खाडी पात्राला धोका निर्माण होण्याची भिती सातत्याने व्यक्त होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून अशा रेती उपसा करणाऱ्यांवर वारंवार कारवाई केली जाते. आठवड्याभरापूर्वीच कळवा येथील खारेगाव भागातील रेतीबंदर खाडीत रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु, यानंतरही रेती उपसा थांबलेला नसल्याची बाब पुन्हा एकदा पुढे आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंब्रा रेल्वे पुलाजवळ असलेल्या खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या महसुल आणि तहसील विभागाने येथे कारवाई केली. या कारवाईमध्ये पथकाने मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे रुळाजवळीत खाडी परिसरात गस्त घातली. या गस्त दरम्यान दिवा खाडीमध्ये एक बोट (बार्ज) आणि संक्शन पंपच्या सहाय्याने अवैधपणे रेती उत्खनन होत असल्याचे आढळून आले. महसूल विभागाच्या पथकाने तत्काळ हस्तक्षेप करत, सदर बार्ज आणि संक्शन पंप खाडीमध्ये बुडवून नष्ट केले. नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ५० लाख रुपये इतकी आहे. या संयुक्त कारवाईमुळे खाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर मोठा आळा बसणार असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, पुढील काळातही अशी कारवाई सातत्याने सुरू ठेवली जाणार आहे. रेल्वे पुलाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ नये, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे,अशी माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.