ठाणे – मागील काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील फुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी फुले कुजल्याने उत्पादनात घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परिणामी ठाण्यातील फुलबाजारात फुलांची आवक घटल्याने फुलांच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर ही दरवाढ झाली असून शेवंतीचे दर ४०० रूपये किलो तर, गुलाब ६०० रूपये किलोने विकला जात आहे. इतर फुलांचे दरही दुप्पटीने वाढले आहेत.

ठाणे जिल्ह्यात यंदा दीड लाखांहून अधिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. त्यामुळे या उत्सवाची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे. दीड, पाच, सात आणि दहा दिवसांच्या घरगुती तसेच सार्वजनिक उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. गणेश मुर्तीच्या आगमन ते आदरातिथ्यात कोणतीही कमी पडू नये, यासाठी गणेशभक्त अनेक दिवसांपासून तयारीला लागले होते. सजावट आणि पूजेसाठी गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठात फुलांना सर्वाधिक मागणी असते. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस पडत असून त्याचा परिणाम फुलांच्या उत्पादनावर झाला आहे.

पावसामुळे शेतातील फुलांचे नुकसान झाले असून फुलांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यात पावसाच्या पाण्याने फुले भिजली जातात. त्यामुळे ती बाजारात दाखल होईपर्यंत कुजण्याचे प्रमाण जास्त असते. या कारणाने फुलांची आवक कमी होत आहे. एकीकडे आवक घटली असतानाच दुसरीकडे गणेशोत्सवामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. ठाणे शहरातील बाजारात फुलांचे दर हे दुप्पटीने वाढले आहेत. पुणे, जुन्नर, नाशिक, सातारा, कोल्हापुर आणि सोलापूर या जिल्ह्यातून ठाण्यासह उपनगरांमध्ये फुलांची आवक होते. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांची आवक घटली आहे.

गोंडा आधी ६० ते ८० रूपये किलोने विकला जात होता. आता २०० रूपये किलोने विकला जात आहे. तसेच शेवंती आधी १०० रूपये किलो तर आता ४०० रूपये किलोने विक्री होत आहे. गुलाब आधी २०० रूपये किलोने होता. आता ६०० रूपये किलोने विक्री होत आहे. सजावटीसाठी वापरली जाणारी अस्टरची फुले आधी ८० रूपये किलोने विक्री केली जात होती. आता १८० ते २०० रूपये किलोने विक्री होत आहेत.

पावसामुळे फुलांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारात फुलांची आवक घटली आहे. गणेशोत्सवानिमित्त फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणी अधिक असल्याने फुलांचे दर वाढले आहेत. हे दर गौरी आगमनापर्यंत असतील त्यानंतर फुलांचे दर कमी होण्याची शक्यता आहे. – शिवम घोगरे, फुल विक्रेते

फुलांचे दर(किलो)

  • गोंडा – २०० रूपये
  • गुलाब – ६०० रूपये
  • शेवंती – ४०० रूपये
  • अस्टर – १८० ते २०० रूपये
  • कमळ – ४० रूपये ( एक नग)
  • लिली – ५० रू ( एक बंडल)
  • कनेरी – १००० रूपये