बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपला प्रचार वेगात सुरू केला असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी निधीचे बळ देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून आमदार किसन कथोरे यांनी प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांना “दहा लाख रुपयांच्या दोन विकासकामांचे टॉनिक” देण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच झालेल्या बदलापूर शहर कार्यकारिणी घोषित करण्याच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार किसन कथोरे यांनी ही माहिती दिली. लवकरात लवकर त्याचे भूमिपूजन करा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमात बोलताना आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर नगरपरिषदेत यंदा भाजपचाच नगराध्यक्ष विजयी होईल, असा दावा केला. ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहोत. कार्यकर्त्यांच्या मेहनतीशिवाय विजय शक्य नाही, म्हणूनच प्रत्येक प्रभागात दोन विकासकामे देऊन कार्यकर्त्यांना बळ देत आहोत, असेही त्यांनी भाषणात सांगितले.
बदलापुरात एकूण २४ प्रभाग आहेत आणि प्रत्येक प्रभागासाठी दहा-दहा लाखांच्या दोन विकासकामांची निवड करा. ही कामे उमेदवारांनी माझ्याकडून पत्राद्वारे मंजूर करून घ्यावीत आणि रविवारपासून प्रत्येक प्रभागात या कामांचा शुभारंभ करावा, असे निर्देश आमदार कथोरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा म्हणूनच या कामांचा आराखडा आखण्यात आला असल्याचे ते म्हणाले. ही कामे केवळ निवडणुकीसाठी नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या अंगात ऊर्जा यावी म्हणून देत आहोत. नुकतेच आपण पाच कोटींची कामे दिली होती, आता आणखी सात ते आठ कोटींची कामे देत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांना टॉनिक मिळावे, म्हणून ही विकासकामे हाती घेत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे माजी नगराध्यक्ष राम पातकर, जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे, शहराध्यक्ष किरण भोईर, राजेंद्र घोरपडे, रमेश सोळसे, शैलेश वडनेरे आदी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भाजपच्या या नव्या “विकास टॉनिक” रणनीतीने बदलापुरातील राजकीय वातावरण तापले असून, प्रतिस्पर्धी पक्षांच्या गोटातही यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपची तयारी
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवणाऱ्या आमदार किसन कथोरे यांनी यंदा नगराध्यक्ष पदावर भाजपचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर बळ देण्यासाठी निधीची मदत द्यायचे धोरण त्यांनी अवलंबले आहे. त्यासोबतच प्रत्येक प्रभागात बैठकांचे सत्र सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहे. त्यामुळे पालिका निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच भाजपने प्रतिस्पर्धी पक्षांना सर्वच बाजूने आव्हान देण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र आहे.
