डोंबिवली – अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेतील डोंबिवलीतील हवाई सेविका रोशनी राजेंद्र सोनघरे यांच्यावर गुरूवारी सकाळी येथील शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानभूमीत नातेवाईक, शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या आठवड्यात अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून अहमदाबाद ते लंडन धावणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग विमानात रोशनी सोनघरे (२७) यांचे हवाई सेविका म्हणून कर्तव्य होते. कर्तव्यावर असताना विमानाला अपघात होऊन इतर विमान प्रवासी आणि सहकारी कर्मचाऱ्यांसोबत त्यांचा मृत्यू झाला होता. कष्ट, जिद्दीने आपला शैक्षणिक प्रवास करून रोशनी सोनघरे यांनी हवाई सेविकापर्यंत प्रवास केला होता.

विमान अपघातात जळून खाक झाले होते. त्यामुळे मृतांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची डीएनए चाचणी करण्यात येत होती. मग मृतदेहाची ओळख पटवून तो मृतदेह तपास यंत्रणांकडून कुटुंबीयांना ताब्यात दिला जात होता. अपघात घडल्यानंतर रोशनी यांचे वडील राजेंद्र आणि भाऊ विघ्नेश सोनघरे अहमदाबाद येथे गेले होते. त्यांची डीएनए चाचणी यशस्वी होऊन रोशनी यांच्या मृतदेहाची ओळख पटल्यावर त्यांचा मृतदेह बुधवारी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हवाई सेविका रोशनी सोनघरे यांचा मृतदेह एअर इंडियाच्या विशेष विमानातून मुंबई विमानतळावर आणण्यात आला. गुरूवारी सकाळी नऊ वाजता रोशनी यांचे पार्थिव नातेवाईकांच्या दर्शनासाठी घरी आणण्यात आले. रोशनीचे पार्थिव घरी आणताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. परिसरात शोकाकुल वातावरण होते.

फुलांनी सजविलेल्या स्वर्गरोहण रथातून रोशनी सोनघरे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. नातेवाईक, शहरातील विविध स्तरातील नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. रोशनी यांचे वडील राजेंद्र सोनघरे यांनी पार्थिवाला अग्नी दिला.

डोंबिवलीत राजाजी पथावरील मढवी बंगल्या मागील एका सोसायटीत आई, वडील आणि भाऊ यांच्या सोबत त्या राहत होत्या. इन्स्टाग्रामवर त्यांना ५४ हजाराहून अधिक अनुयायी होते. विमान सेवेत त्यांना विदेशातील दौऱ्यांची आवड होती. यापूर्वी त्यात स्पाईस जेट विमान कंपनीत नोकरीला होत्या. दोन वर्षापूर्वी त्या एअर इंडियामध्ये दाखल झाल्या होत्या. विदेशातील विमान सेवेतील कर्तव्यावर त्या प्राधान्याने असायच्या. रोशनी यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या इन्स्टाग्रामवरील खात्यावर अनुयायांनी शोक व्यक्त केला होता.

मनमिळाऊ स्वभावाच्या रोशनी यांचा अलीकडेच विवाहाच्या वाटाघाटी कुटुंबीयांनी सुरू केल्या होत्या. रोशनी यांना अपेक्षित सुस्वभावी ठाणे येथील मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला असलेल्या तरूणा बरोबर रोशनी यांचा विवाह निश्चित करण्यात येत होता. नोव्हेंबरमध्ये रोशनी यांचा साखरपुडा करून पुढील वर्षी मार्चमध्ये त्यांच्या लग्नाचे नियोजन कुटुंबीयांकडून केले जात होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. नोकरीत नुकतीच सुस्थिर होऊन बोहल्ल्यावर चढण्यापूर्वीच रोशनी यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.