कल्याणमध्ये आंबिवली रेल्वे स्थानकात दारूच्या नशेत असलेल्या एका फेरीवाल्याने एका रेल्वे पोलिसाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम कांबळे असे फेरीवाल्याचे नाव आहे. तो ठाणे ते कल्याण दरम्यान लोकलमध्ये फेरीवाला म्हणून व्यवसाय करतो.

मंगळवारी (२९ मार्च) रात्री गौतम कांबळे आंबिवली रेल्वे स्थानकात महिलांच्या डब्याजवळ उभे राहून शिवीगाळ करत उभा होता. गौतम दारू प्यायला असल्याने त्याच्याकडून महिलांची छेडछाड होण्याची शक्यता होती. त्यामुळे रेल्वे स्थानकात गस्तीवर असलेल्या रोहित जाधव या पोलीस कर्मचाऱ्याने गौतमला महिलांच्या डब्याजवळून बाजूला होण्यास सांगितले.

आरोपीकडून पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण

पोलिसाच्या इशाऱ्याकडे गौतमने दुर्लक्ष केले. तसेच आरोपी गौतम पोलीस कर्मचारी जाधव यांना शिवीगाळ करू लागला. जाधव यांनी त्याला हाताला पकडून बाजूला घेतले. त्याला समजावून सांगून घरी जाण्यास सांगितले. यावेळी फेरीवाला गौतम याने हवालदार जाधव यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

हेही वाचा : मुंब्रा दिवा खाडीत वाळूमाफियांकडून अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न, प्रशासनाकडून ४ कोटींचा मुद्देमाल नष्ट

गस्तीवरील पोलिसांनी गौतम कांबळे याला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणला असल्याचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे.

Story img Loader