निवडणुकीची लगबग

करोना महासाथीमुळे लांबलेल्या ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांची लगबग अखेर सुरू झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात कच्ची प्रभाग रचना तयार करण्यासाठी निश्चित; राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

ठाणे : करोना महासाथीमुळे लांबलेल्या ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांची लगबग अखेर सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने कच्ची प्रभाग रचना करण्यासाठी जिल्ह्यातील महापालिकांना कालावधी ठरवून दिला आहे. यानुसार ठाणे आणि उल्हासनगर पालिकेला ३० नोव्हेंबर तर नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली पालिकेला १८ नोव्हेंबपर्यंत कच्ची प्रभाग रचना तयार करावी लागणार आहे. मीरा-भाईंदर पालिकेला १५ फेब्रुवारी आणि भिवंडी- निजामपूर पालिकेला २५ डिसेंबपर्यंत कच्ची प्रभाग रचना तयार करावी लागणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. जिल्ह्यातील नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवली महापालिकांमध्ये सध्या प्रशासकीय राजवट असून ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांमधील लोकप्रतिनिधींची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. याशिवाय मीरा-भाईंदर आणि भिवंडी- निजामपूर महापालिकांमधील नगरसेवकांची मुदत पुढील वर्षी मध्यावर संपणार असून अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांच्या निवडणुकांचीही प्रतीक्षा आहे. त्यामुळे पुढील वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असणार आहे. करोनाची परिस्थिती आटोक्यात येताच राज्य शासनाने महापालिकांची तीन सदस्य प्रभाग पद्धतीने तर नगरपालिकांची दोन सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२१ मध्ये जनगणना झाली नसल्यामुळे जुन्याच म्हणजेच २०११ च्या जणगणनेनुसार या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे नगरसेवक संख्येत वाढ होणार नसल्याची चर्चा सुरू होती. असे असतानाच राज्य शासनाने नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना नुकतेच एक पत्र पाठविले असून त्यामध्ये कच्ची प्रभाग करण्यासाठी कालावधी ठरवून दिला आहे. तसेच पालिका क्षेत्रातील लोकसंख्येनुसार किती प्रभाग तयार करावेत याबाबतही सूचना केली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांची कच्ची प्रभाग रचना करण्यासंदर्भात आयोगाकडून अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेवटचा प्रभाग दोन किंवा चार सदस्यांचा

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील महापालिकांचा शेवटचा प्रभाग दोन किंवा चार सदस्यांचा होणार आहे. त्यानुसार ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शेवटचा प्रभाग चार सदस्यांचा होणार आहे. तर नवी मुंबई, उल्हासनगर आणि भिवंडी- निजामपूर महापालिकांचा शेवटचा प्रभाग दोन सदस्यांचा होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Almost election party political ysh

Next Story
सोनावणेंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा
ताज्या बातम्या