बदलापूरः अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे स्थानिक राजकारण ढवळून निघते आहे. नगराध्यक्ष पद आणि प्रभागनिहाय आरक्षणाचे चित्र स्पष्ट होताच अनेक पक्षांत हालचाल वाढल्या आहेत. मात्र, या उत्साहात पक्षनिष्ठेपेक्षा “कुटुंबनिष्ठा” पुढे येताना दिसत आहे.

विशेषतः शिवसेना आणि भाजपातील काही प्रभावशाली नेते आपल्या कुटुंबातील दोन ते चार सदस्यांना उमेदवारी मिळावी म्हणून वरिष्ठांकडे आक्रमकपणे प्रयत्न करत आहेत. या “कुटुंबराजकारणा”मुळे गेली पाच वर्षे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी पक्षांतर्गत नाराजीचे वातावरण तयार झाले असून, वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

अंबरनाथमधील शिवसेनेतील पहिल्या फळीतील काही ज्येष्ठ नेत्यांकडून एकाच घरातील सदस्यांना एकाहून अधिक तिकिटे देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी तर पती, पत्नी, मुलगा अशा सर्वांसाठी तिकिटाची मागणी होत असल्याची चर्चा आहे. बदलापूरमध्येही अशाच प्रकारे शहरातील दोन प्रमुख पक्षांमध्ये “घराणेशाही”चा प्रभाव जाणवत असून, पक्षांतर्गत गटबाजी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भाजपातही परिस्थिती फार वेगळी नाही. काही प्रभावशाली नेते आणि माजी पदाधिकारी आपल्या कुटुंबीयांना पुढे आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करत असल्याची चर्चा रंगली आहे. “आपल्यासह पत्नी, नातेवाईक किंवा मुलाला उमेदवारी मिळालीच पाहिजे” या हट्टामुळे स्थानिक स्तरावरील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या संधीवर गदा येत असून त्यामुळे नवख्या इच्छुकांची चिंता वाढली आहे. एकतर नगराध्यक्ष पदासाठी कुटुंबातील महिलेला संधी द्या अन्यथा अधिकची तिकिटे द्या, अशी मागणी केली जाते आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांची निराशा

गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने जनतेत काम करून नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांची निराशा होण्याच्या भितीने झोप उडाली आहे. प्रत्येक वेळी मोठ्या नेत्यांच्या घरातील सदस्यांनाच तिकिट मिळते आणि आम्हाला पुन्हा पुढच्या वेळेचे आश्वासन दिले जाते, हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे., अशी प्रतिक्रिया एका नवख्या मात्र पक्षासाठी झटणाऱ्या उमेदवाराने दिली आहे. यापूर्वी अंबरनाथ बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये शेवटची पालिका निवडणूक २०१५ वर्षात झाली होती. १० वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत प्रत्येकालाच नशिब आजमवायचे असून त्यामुळे नवख्यांना ज्येष्ठांची धास्ती वाटू लागली आहे.

वरिष्ठांची डोकेदुखी वाढणार

स्थानिक नेत्यांच्या “कुटुंबप्रेमा”मुळे जिल्हा पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनाही तिकीट वाटपात अडचणी निर्माण होणार आहेत. एकीकडे जुन्या नेत्यांचा दबाव, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करताना संतुलन राखणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर नवीन नेतृत्वाची फळी तयार करावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे. वरिष्ठ नेते जुन्या दबावगटांना न जुमानता नव्या चेहऱ्यांना संधी देतात का, हे पाहणे आगामी निवडणुकीतील सर्वात उत्सुकतेचा मुद्दा ठरेल.