अंबरनाथः उल्हासनगरच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयावरील भार कमी करण्यासाठी न्यायदानात गती येण्यासाठी अंबरनाथ शहरात कनिष्ठ न्यायालयाला मंजुरी मिळाली होती. मात्र विविध कारणांमुळे रखडलेल्या या न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहुर्त आता ठरला आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी या न्यायालयाचे उद्घाटन होणार आहे. त्याच दिवशी येथे कामकाजही होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर शहरातील पोलीस आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

३६ वर्षांपूर्वी १९८९ साली उल्हासनगरच्या न्यायालयाची उभारणी करण्यात आली होती. बदलापूरपासून उल्हासनगर पर्यंतच्या खटल्यांसाठी सध्याच्या घडीला उल्हासनगरचे दिवाणी व फौजदारी हे एकमेव न्यायालय आहे. या न्यायालयावरील कामाचा भार कमी करण्यासाठी अंबरनाथ येथे कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथमवर्ग दंडाधिकारी यांच्या न्यायालयाच्या उभारणीला परवानगी मिळाली होती. त्यानंतर सात वर्षांपूर्वी २०१८ मध्ये या न्यायालयासाठी १९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ६ कोटी रुपये न्यायालयाच्या उभारणीसाठी प्राप्त झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या न्यायालयाचे काम केले गेले. इमारत उभारली असली तरी या न्यायालयाच्या मार्गात अडथळे होते.

अंबरनाथच्या चिखलोली भागात काटई आणि कल्याण बदलापूर राज्य मार्गाच्या जोड रस्त्याला हे न्यायालय आहे. मात्र मुख्य रस्त्याशेजारी बारवीच्या जांभुळ येथील केंद्रातून येणाऱ्या जलवाहिन्या होत्या. दुसऱ्या बाजुने न्यायालयाचा आराखडा मंजूर करतेवेळी अंबरनाथ नगरपालिकेने विकास आराखड्यात दर्शविलेला रस्ता उभारला नव्हता. त्यामुळे न्यायालयाचा मार्ग पू्र्ण नव्हता. अखेर गेल्या वर्षात त्याचे आणि न्यायालयासमोरील जलवाहिन्या खाली करण्याचेही काम पूर्ण झाले.

रंगरगोटी, अंतर्गत फर्निचर आणि इतर सुविधांचे कामही या काळात पूर्ण झाले. मात्र उद्घाटनाचा मुहुर्त लागत नव्हता. अखेर या न्यायालयाच्या उद्घाटनाची तयारी सुरू करण्यात आली असून येत्या ९ ऑगस्ट रोजी न्यायालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या उद्घाटनाच्या तयारीसाठी प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकतीच न्यायाधिशांच्या समितीने या न्यायालयाच्या इमारतींची आणि सुविधांची पाहणी केली. पाहणीदरम्यान न्यायाधीशांनी इमारतीतील विविध दालनांची तसेच सुविधांची माहिती घेतली. ९ ऑगस्ट रोजी उद्घाटनासह कामकाजही केले जाण्याची शक्यता आहे.

पोलिसांसह वकिलांचाही वेळ वाचणार

अंबरनाथच्या या कनिष्ठ न्यायालयातून बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिम, अंबरनाथचे शिवाजीनगर आणि अंबरनाथ तसेच कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांवर कामकाज होईल, अशी माहिती आहे. त्यामुळे उल्हासनगरला जाण्याचा वेळ वाचणार आहे. तसेच नागरिक आणि वकिलांनाही याचा फायदा होणार आहे.