अंबरनाथ: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) अंबरनाथमध्ये मोठा धक्का बसला आहे. शहराध्यक्ष कुणाल भोईर, जिल्हा संघटक संदीप लकडे, शहर संघटक स्वप्निल बागुल आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी पक्ष सोडून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नव्या प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना, “अंबरनाथ शहराच्या विकासासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करायचे आहे. शिवसेना सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष आहे. नव्या सहकाऱ्यांच्या सहभागामुळे शहरात विकासाच्या गतीला नवा वेग मिळेल,” असे सांगितले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही पक्षबांधवांचे अभिनंदन करत, अंबरनाथमध्ये पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.
मनसे शहराध्यक्ष म्हणून सक्रिय असलेले कुणाल भोईर यांनी, “अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे स्पष्ट केले. संदीप लकडे, स्वप्निल बागुल आणि अपर्णा भोईर यांनीही यावेळी आपली भूमिका मांडत, जनतेच्या सेवेसाठी शिवसेना हेच योग्य व्यासपीठ असल्याचे म्हटले.
या प्रवेशामुळे अंबरनाथमधील मनसेच्या संघटनेत मोठे खिंडार पडले असून, शिवसेनेचा स्थानिक पातळीवरचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी चुरस निर्माण होणार आहे.
इतर पक्षाचेही प्रवेश
मनसेसोबतच इतर पक्षांतूनही मोठा ओघ शिवसेनेत दिसून आला. कल्याण पश्चिमचे माजी अपक्ष नगरसेवक अरुण गिध, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेश बोरगावकर तसेच उबाठा गटाचे टिटवाळा उपशहरप्रमुख श्रीधर दादा खिस्मतराव, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर मडवी आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सदस्यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
मनसे रिकामी
अंबरनाथ शहरातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसे पक्ष रिकामा झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून यासाठी हालचाली सुरू होता. विशेष म्हणजे हेच पदाधिकारी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांशी कायम संपर्कात असायचे. मात्र याच पदाधिकारी यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला होता. तेव्हापासून ही जवळीक वाढल्याची चर्चा होती. त्यानंतर आता या प्रवेशाने अंबरनाथ शहरात शिवसेनेला मनसेचा प्रभाव असलेल्या भागातही पाठिंबा मिळणार आहे.