ठाणेः अंबरनाथ मनसेला मोठा धक्का देत शहर अध्यक्षासह प्रमुख चार पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अचानक झालेल्या या प्रवेशामुळे शहरात चर्चेला उधाण आले. मात्र जुलै महिन्यात अंबरनाथच्या मनसे जिल्हा उपाध्यक्षाने एक फेसबुक पोस्ट करत शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहायक यांच्यावर टीका केली होती. तेव्हापासूनच मनसेच्या या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाचा मुहुर्त ठरल्याचे बोलले जाते. हे पदाधिकारी शिवसेनेच्या संपर्कात होतेच. मात्र ही पोस्ट कळीचा मुद्दा ठरल्याची चर्चा आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. येथे भाजपचे आमदार अधिक असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे वजन अधिक आहे. त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ शहरात त्यांचे अधिक लक्ष असते. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे महत्वाचे प्रकल्प याच अंबरनाथ शहरात आहेत.
शिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, स्पर्धा परिक्षा केंद्र, नाट्यगृह, नुकतेच उद्घाटन झालेले न्यायालय, जागतिक दर्जाचा तरण तलाव आणि क्रीडा संकूल यासारखे अनेक प्रकल्प शहरात उभे झालेत आणि काही उभे राहत आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांचे सहकारी शहरातील विकासकामांवर लक्ष ठेवून असतात.
प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांचे सहकारी, स्वीय सहायक स्थानिक प्रशासनाशी संवाद साधत असतात. निधीचे वाटप करण्यात शिंदे पितापुत्र भेदभाव करत नाहीत, हे सर्वश्रुत आहेत. त्यामुळे इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशीही त्यांचा संवाद होत असतो. मात्र या संवादापासून दूर असलेले त्यावर टीका करतात. अशीच काहीशी टीका अंबरनाथ शहरातील एका मनसेच्या जिल्हा उपाध्यक्ष दर्जाच्या पदाधिकाऱ्याने केली होती. ही टीका खासदारांच्या स्वीय सहायकावर केली होती. मात्र त्यात तथ्यांपेक्षा आरोपांवर भर देण्यात आला होता.
हीच टीका अंबरनाथ शहरात मनसेच्या फुटीला कारणीभूत ठरल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. अंबरनाथ शहराच्या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, त्या फेसबूक पोस्टनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेले मनसेचे पदाधिकारी आणखीच जवळ आले. त्यानंतर पक्ष प्रवेशाची तयारी पूर्ण करत मुहुर्त ठरल्याचेही बोलले जाते. त्यामुळे ती पोस्ट मनसे पक्षासाठीच अनावश्यक आणि त्रासदायक ठरल्याची चर्चा रंगू लागली आहे.