अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या अंतिम मतदार यादीत समोर आलेल्या गोंधळाबाबत स्पष्टीकरण हा गोंधळ तांत्रीक त्रुटींमुळे झाल्याची स्पष्टोक्ती अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने दिली आहे. लवकरच सुधारित आणि अचूक मतदार यादी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पालिका प्रशासनाने सांगितले आहे. मतदार यादीतील घोळामुळे गेल्या काही दिवसात विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी आक्षेप घेतले होते. त्यामुळे गोंधळाची स्थिती होती.
अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांकडून आलेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन स्थळ पाहणीद्वारे आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. मात्र, या प्रक्रियेदरम्यान हरकती नियंत्रण तक्ता (ऑब्जेक्शन कंट्रोल चार्ट) पुन्हा अपलोड करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.
परिणामी काही नोंदींचे दुबारीकरण होऊन काही मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात दिसू लागली होती. त्यामुळे अनेक मतदार गोँधळले होते. त्याचवेळी मतदार याद्यांवर काम करणाऱ्या राजकीय पक्षांचीही झोप उडाली होती. प्रारूप मतदार यादीत असलेले मतदार अंतिम यादीत थेट दुसऱ्या प्रभागात गेल्याने चर्चांना उधाण आले होते. आधीच राज्यभर मतदार यादीतील घोळावरून गोंधळ सुरू असताना शहरातही असाच प्रकार झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
अनेक माजी नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेत धाव घेत यात दुरूस्तीची मागणी केली होती. त्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत यांनी याबाबत खुलासा केला.
या तक्रारी आणि त्रुटी त्वरित लक्षात घेत सुधारणा प्रक्रियेवर काम सुरू करण्यात आले आहे. अंबरनाथ नगरपालिकेने आता सर्व नोंदींची पडताळणी करून अचूक व अद्ययावत मतदार यादी तयार केली असून ती लवकरच सर्वांसाठी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक २६ महालक्ष्मी नगर, संतोषी माता नगर परिसर या प्रभागातील मतदार यादी मध्ये २००९ पासुन जवळपास १०० मतदार हे एकाच पत्त्यावर असुन यातील बहुतांश मतदार कोण आहेत हे कळत नाही, असे सांगत प्रविण गोसावी यांनी आक्षेप घेतला होता. राज्य निवडणुक आयोगाला विनंती आहे हे मतदार कोण आहेत ते शोधुन द्या आणि त्यासाठी पाच लाखांचे बक्षिस मिळवा, असेही आवाहन गोसावी यांनी केले होते. त्यानंतर शहरातील याद्यांवर पुन्हा चर्चांना उधाण आले होते.
