अंबरनाथ : बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना न्यायदानाची सुविधा मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेले अंबरनाथचे कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथमवर्ग दंडाधिकारी न्यायालय अखेर सुरू होत आहे. येत्या ९ ऑगस्ट २०२५ रोजी चिखलोली येथील या नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते सकाळी होणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असतील. अध्यक्षपद ठाणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल भूषवतील. तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक, मंजुषा देशपांडे आणि अद्वैत सेठना हेही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
अंबरनाथ न्यायालय उभारणीची प्रक्रिया दीर्घकाळ रखडली होती. १९८९ साली उल्हासनगरचे दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू झाले होते, तेव्हापासून बदलापूर ते अंबरनाथ परिसरातील सर्व खटले तेथेच चालत होते. या वाढत्या भारामुळे अंबरनाथ येथे स्वतंत्र न्यायालयाची गरज निर्माण झाली. २०१८ मध्ये या न्यायालयासाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, त्यातील पहिल्या टप्प्यात ६ कोटी रुपये बांधकामासाठी उपलब्ध झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत उभारली, मात्र रस्त्याचा अभाव आणि बारवीच्या जांभुळ येथील जलवाहिन्यांमुळे न्यायालय सुरू होण्यास विलंब झाला. गेल्या वर्षभरात रस्ता पूर्ण करण्यात आला आणि जलवाहिन्याही हलवण्यात आल्या. त्यानंतर रंगरंगोटी, फर्निचर व इतर अंतर्गत सुविधा पूर्ण झाल्या.
नवीन न्यायालयामुळे बदलापूर पूर्व-पश्चिम, अंबरनाथ शिवाजीनगर, अंबरनाथ तसेच कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांवर येथून सुनावणी होईल. त्यामुळे पोलिस, वकील आणि नागरिकांचा उल्हासनगरला जाण्याचा वेळ व खर्च वाचणार आहे. विशेषतः गुन्हेगारी प्रकरणांत तत्काळ कार्यवाहीसाठी हे न्यायालय महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्हा न्यायालय ठाणे, जिल्हा न्यायालय कल्याण, उल्हासनगर तालुका वकील संघटना आणि पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर तयारी करत आहेत. नुकतीच न्यायाधीशांच्या समितीने इमारतीची पाहणी करून विविध दालनांची आणि सुविधांची माहिती घेतली.
या कार्यक्रमाला वकील, कायद्याचे विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, चिखलोली-अंबरनाथ आणि उल्हासनगर तालुका बार ॲडव्होकेट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. संजय सोनवणे यांनी केले आहे. नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळवून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.