अंबरनाथ : नदी नाल्यांमध्ये होणारे प्रदुषण रोखण्यासाठी औद्योगिक वसाहतींमधून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्याच्या टँकरवर निर्बंध असावेत या हेतूने पाच वर्षांपासून सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत टँकर बंदी लागू करण्यात आली. मात्र त्यानंतरही रात्रीच्या वेळी टँकरची वाहतूक सुरूच असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तरीही पुन्हा या टँकर बंदीचे आदेश काढले जात असून त्याचा किती हेतू साध्य होतो आहे याबाबत साशंकता व्यक्त होते आहे.
उल्हासनगर महानगरपालिका विरुध्द वनशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल खटल्यात सुनावणीवेळी आदेशित केल्याप्रमाणे राज्याच्या मुख्य सचिवांनी नोव्हेंबर २०२० मध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने मुख्य सचिवांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. ज्यात औद्योगिक क्षेत्रामध्ये सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारचे टँकर वाहतूकीला त्वरीत बंदी घालण्याचे आश्वासित केले होते.
औद्योगिक क्षेत्रामध्ये सांयकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत टँकरमधून धोकादायक रसायने वाहून नेऊन ते रात्रीच्या वेळी नदीच्या पात्रात सोडले जातात, असा संशय होता. तसे काही प्रकारही अंबरनाथ आणि उल्हासनगरात समोर आले होते. त्यामुळे नाले आणि नदीचे पाणी प्रदूषित होते.
पाणी प्रदूषित झाल्याने लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो आणि नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो. त्यामुळे तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ अन्वये डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर बंदीबाबत आदेश काढण्यात आले.
गेल्या पाच वर्षांपासून हे आदेश सातत्याने काढले जात आहेत. विशेष शाखेच्या उपायुक्तांकडून हा आदेश यंदाही काढण्यात आला आहे. ५ जुलै ते २ सप्टेंबरपर्यंत हा आदेश अंमलात राहणार आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावणी होते का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास गुजरातहून डोंबिवलीकडे येणाऱ्या टँकरचा कल्याण शिळफाटा रस्त्यावर कल्याण फाट्याजवळ अपघात झाला. हा टँकर रसायने घेऊन औद्योगिक वसाहतीमध्ये जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही या औद्योगिक क्षेत्रात टँकरबंदी असताना टँकरची वाहतूक कशी सुरू होती असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
सरसकट टँकर बंदीला यापूर्वीही उद्योजकांनी विरोध केला आहे. त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या टँकरच्या खर्चाचे गणित बिघडत असल्याची तक्रार असून त्याचा फटका उद्योजकांना बसतो आहे. त्यामुळे फक्त कागदोपत्री टँकर बंदी किती काळ चालवणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.
अंबरनाथ शहरात रासायनिक टँकरमधून रसायने सोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर आले होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वालधुनी नदी किनारी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, औद्योगिक वसाहतींमध्ये प्रवेश करणाऱ्या टँकरची तपासणी करणे अशा गोष्टी सूचवण्यात आल्या होत्या. मात्र त्यातील एकही गोष्ट आजतागायत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या टँकर वाहतूक बंदीच्या निर्णयाने नेमके काय साध्य होते असा प्रश्न उपस्थित होतो आहे.