अंबरनाथः अंबरनाथ काटई रस्त्यावर दिवसेंदिवस उभ्या राहणाऱ्या नागरी वस्ती आणि इमारतीमुळे या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यातच शनिवारी या मार्गावर खोणी ते नेवाळी मार्गिकेवर एक भला मोठा टँकर चाक निखळल्याने नादुरूस्त झाला. त्यामुळे भर रस्त्यात हा टँकर एका बाजूला झुकला होता. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. हा टँकर कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती होती. या ठिकाणी वाहतूक पोलीस मात्र पाहायला मिळाले नाहीत.
अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या वेशीवर ग्रामीण भागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाले आहे. या नागरिकरणामुळे या भागात वाहनांची संख्याही वाढली आहे. सध्या खोणी तळोजा या मार्गावरून होणारी अवजड आणि इतर प्रवासी वाहतूक तसेच काटई अंबरनाथ मार्गावर होणारी वाहतूक यामुळे खोणी चौकाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. याच भागात परवडणाऱ्या घरांचा मोठा प्रकल्प आहे. या परिसरात गेल्या काही वर्षात मोठमोठे हॉटेल्स, धाबे आणि उपहारगृहही सुरू झाले आहेत. प्रवासी संख्या वाढल्याने येथे रात्रंदिन वाहनांची वर्दळ असते.
काटई नेवाळी मार्गाव खोणी चौक हा अत्यंत वर्दळीचा चौक आहे. या चौकात एखादे वाहन धिम्या गतीने चालू लागले अथवा बंद पडले तर त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. अशीच परिस्थिती शनिवारी निर्माण झाली. खोणी येथील म्हाडाच्या गृहसंकुलांचा मोठा प्रकल्प आहे. त्यामुळे येथे अवजड वाहनांची येजा होत असते. शनिवारी येथे असाच एक अवजड टँकर बंद पडला.
या टँकरचे एक चाक नादुरूस्त झाले. त्यामुळे हा टँकर नेवाळीकडे जाण्याच्या दिशेला एका बाजूला पूर्णपणे झुकला होता. त्या चाकाच्या जागी एक टेकू लावून हा टँकर पडण्यापासून रोखण्यात आला होता. मात्र हा टँकर कधीही पडण्याची भीती होती. त्याच भीतीच्या छायेत या भागातून वाहतूक केली जात होती. अनेक वाहनचालक येथून जाताना जीव मुठीत धरून वाहतूक करताना दिसत होती. सायंकाळपर्यंत हा टँकर तसाच झुकलेल्या स्थितीत होता. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांची कोंडी होत होती.