सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांनी त्यांच्या वाहनांवरील लाल दिवे काढावे असा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर प्रत्येक भारतीय हा विशेष आहे, प्रत्येक भारतीय हा व्हीआयपी आहे. असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर बहुतेक मंत्री, पदाधिकारीच काय तर मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या वाहनांवरील लाल दिवे काढून टाकले. परंतु, अमित शहा आज ज्या वाहनामधून आले त्या वाहनावर अद्यापही लाल दिवा असल्याचे पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या.

अमित शहा आणि मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार हे दोघे लाल दिव्याच्या वाहनातून एका कार्यक्रमासाठी आले. आज ठाण्यामध्ये शहा यांच्या हस्ते २९ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे उद्धाटन झाले. त्यावेळी ते लाल दिव्याच्या वाहनातून आले होते. १ मे च्या आधी लाल दिवे काढून टाकण्यास सांगण्यात आले आहेत. देशातील ‘व्हीआयपी कल्चर’ संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.