ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाणे पोलिसांवर विश्वास व्यक्त करत संपूर्ण चौकशी पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ठाणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भाष्य केले आहे. ठाणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच प्रकरणात अटक झाली. ठाणेकर म्हणून ती बातमी बघितल्यावर खरोखर धक्का बसला. गेल्या तीन वर्षांत महापालिकेमध्ये आयुक्त हे प्रशासक असूनही त्यांच्या अधिकाऱ्यांवर कोणताही वचक नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले. महापालिकेच्या मुख्यालयात उपायुक्त दर्जाचा अधिकारी लाच घेताना पकडला जाणे, हा ठाणे महापालिकेच्या इतिहासातील काळा दिवस आहे, असे परंजपे यांनी सांगितले.आयुक्त गायबठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यावरही परंजपे यांनी टीका केली.
घटनेनंतर दोन-तीन दिवस झाले तरी आयुक्तांनी ठाणेकरांना संबोधित करून खात्री दिली पाहिजे होती की अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. मात्र, ते गायब आहेत, सुट्टीवर आहेत की मंत्रालयात, हेच स्पष्ट होत नाही. प्रशासन प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे होती, असे परंजपे म्हणाले. ठाणे पोलिस सक्षम आहेत, ते निष्पक्ष तपास करतील अशी मला खात्री आहे. पण या प्रकरणातून धडा घेत अनेक अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांवरही तपास सुरू झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
सर्वांची कसून चौकशी झाली
ठाणे पोलिसांनी नेहमी चांगले काम केले आहे. मी कधीही ठाणे पोलीस अधिकाऱ्यांवर चुकीच्या वर्तनाचे आरोप केले नाहीत. लोकप्रतिनिधी म्हणून माझा अनुभव ठाणे पोलिसांविषयी सकारात्मक आहे. मात्र, आता ठाणेकरांचा विश्वास पुन्हा बसावा म्हणून सखोल चौकशी आवश्यक आहे. फॉरेन्सिक तपासात जर ती ऑडिओ क्लिप खरी ठरली, तर ज्या अधिकाऱ्यांची नावे अनधिकृत बांधकाम वसुलीमध्ये आली आहेत, त्यांच्या सर्वांची कसून चौकशी झाली पाहिजे, असे परंजपे यांनी सांगितले.