Anand Paranjape clarifies on meetings with the Thackeray group in Raigad : ठाणे : रायगड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना (ठाकरे गटाचे) जिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या गुप्त बैठक झाल्याची चर्चा असून यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि ठाकरे गटाची युती असल्याची रंगू लागली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे ( Anand Paranjpe ) यांनी स्पष्टीकरण देत महायुतीबाबत महत्वाचे विधान केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या जिल्हानिहाय आढावा बैठकींची मालिका पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. या बैठकींच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. या बैठकींमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्याचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये संघटनात्मक तयारी, उमेदवारांची स्थिती आणि स्थानिक समीकरणे यावर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकींना जिल्हाध्यक्ष, माजी-आजी खासदार, आमदार, विधानसभेतील उमेदवार, प्रमुख पदाधिकारी, तसेच पालकमंत्री आणि संपर्क मंत्री देखील उपस्थित राहणार असल्याचे आनंद परांजपे यांनी सांगितले.

निवडणुका महायुती म्हणूनच लढवाव्यात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतील एक जबाबदार घटक असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढवाव्यात, अशी तिन्ही नेत्यांची एकमताची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांमध्ये याबाबत सतत समन्वय सुरू असल्याचे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.

महायुती एकत्र राहणार, पण

महायुतीतील सर्व घटकांनी एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात, हा आमचा प्रयत्न आहे. जिथे युती शक्य नाही, तिथेही परस्परांमध्ये कटुता निर्माण होऊ न देता, एकमेकांवर आरोप न करता निवडणुका लढल्या पाहिजेत. हीच महायुतीची भूमिका आहे. तसेच, कथित गुप्त बैठका किंवा अंतर्गत मतभेदांबाबत माध्यमांमध्ये जी वृत्त प्रसिद्ध झाली आहेत, ती पूर्णपणे चुकीची आणि तथ्यहीन आहेत, असे परांजपे यांनी स्पष्ट केले.

तो असत्याचा मोर्चा होता

तो सत्याचा नव्हे तर असत्याचा मोर्चा होता. राज ठाकरे यांनी केवळ महायुतीच्या मतदारसंघांची आकडेवारी दिली; पण ज्या ३१ ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार जिंकले, त्या मतदारसंघातील दुबार नावांची आकडेवारी त्यांनी का दिली नाही? जर दुबार मतदारांमुळे महायुती जिंकली असेल, तर मग महाविकास आघाडीचे खासदारही त्याच कारणामुळे जिंकले का, असा प्रश्न परांजपे यांनी उपस्थित केला. मतदार यादी स्वच्छ असली पाहिजे, ही सर्वांची भूमिका आहे. पण राजकीय निष्कर्ष म्हणून ‘महायुती दुबार मतदारांमुळे जिंकली’ हे विधान पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे, असे ते म्हणाले.