मुंबईः चित्रपटात गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याचे तसेच चित्रपटाचा सहनिर्माता करण्याचे आमीष दाखवून एक कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी निर्मात्या प्रेरणा अरोरासह तिघांविरोधात वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार कशिश ऊर्फ नफिसा खान या देखील चित्रपट निर्मिती करतात. त्यांच्याकडून फन्ने खान चित्रपटासाठी रक्कम घेण्यात आल्याचा आरोप आहेत.

याप्रकरणी प्रेरणा अरोरा(४०), प्रोतिमा अरोरा व एका अनोळखी व्यक्तीविरोधात वर्सोवा पोलिसांन गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, २१ मार्च, २०१८ मध्ये प्रेरणा अरोरा, त्यांची आई प्रोतिमा अरोरा या तक्रारदार यांच्या अंधेरी येथील घरी आल्या होत्या. त्यांनी नामांकीत निर्मिती संस्थांसाठी चित्रपट करत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडे मोठ्या रकमेच्या ठेवी आहेत. त्यामुळे हमखास पैसे मिळतील, असे आश्वासन दिले होते. त्याद्वारे विश्वास संपादन केल्यानंतर त्यांनी फन्ने खान या चित्रपटात गुंतवणूक करण्यास सांगितले. ५० लाखांची गुंतवणूक केल्यास १० लाख रुपये नफा परतावा म्हणून दिला जाईल, तसेच चित्रपटाचा सहनिर्माता केले जाईल, असे आमीष दाखवले. तसेच फन्ने खान चित्रपटात पाच टक्के नफा देण्याचे आश्वासन देऊन तक्रारदार कशिश ऊर्फ नफिसा खान यांच्याकडून ५० लाख रुपये घेतले.


२०१९ मध्येही रक्कम घेतल्याचा आरोप


६ जानेवारी २०१९ मध्येही तक्रारदार महिलेकडून वेळोवेळी ८३ लाख रुपये घेण्यात आले. अशी एकूण तक्रारदार महिलेकडून एक कोट ३३ लाख रुपये घेण्यात आले होते, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
धनादेशाचा वापर

तक्रारदार यांनी अरोरा यांच्याकडे रकमेची मागणी केली असता तिने धनादेश दिले होते. पण खात्यात रक्कमच नसल्यामुळे ते वठले नाहीत. तक्रारदार यांनी त्यासाठी बनावट धनादेश व खोट्या स्वाक्षऱ्या करून धनादेश दिल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेकडून घेतलेली रक्कम अद्याप परत केलेली नाही.

आठ चित्रपट वादाच्या भोव-यात

यापूर्वी निर्माते वासू भगनानी यांनीही अरोराविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याप्रकरणी २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार परमाणु, पॅडमॅन, केदारनाथ, बत्तीगुल मिटर चालू, फन्ने खान, टॉयलेट धमाल, झुंड व राणी या आठ चित्रपटांसाठी गॉथिक इंटरटेनमेंटशी करार केले. ही बाब भगनानी यांच्यापासून लपवण्यात आली. यातील पॅडमॅन, फन्ने खान, बत्तीगुल मिटर चालू व राणी(सपना दीदी) व केदारनाथ चित्रपटांसाठी भगनानी यांच्याशी करार केला. या कराराची कागदपत्रेही भगनानी यांना देण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले होते.