कल्याण – मांस बाजारात विक्री करण्यासाठी एका प्राण्याची घरात बेकायदा कत्तल करणाऱ्या डोंबिवली जवळील कचोरे गाव हद्दीतील न्यू गोविंदवाडी भागातील एका इसमा विरुध्द टिळकनगर पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. या इसमाच्या घरातून पोलिसांनी १७५ किलो वजनाचे ४० हजार रूपये किमतीचे मांस जप्त केले आहे.
या इसमाकडे कल्याण डोंबिवली पालिकेचा प्राणी कत्तल किंवा मांस विक्री करण्याचा कोणताही परवाना नाही. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत अशाप्रकारे प्राण्यांची बेकायदा कत्तल करून त्यांची मांस विक्री करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेच्या बाजार परवाना विभागाकडून कोणतीही याविषयी आक्रमक कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षापूर्वी बाजार परवाना विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी विभागप्रमुख वंदना गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मांस, मटण विक्रेते, यांची मांस साठा गृह यांच्यावर कारवाई सुरू केली होती. या छाप्यात ज्यांच्याकडे परवाना नाही त्यांना दंडात्मक कारवाई आणि पालिकेचा परवाना घेण्यास, नुतनीकरण करण्यास भाग पाडले जात होते. या कालावधीत पालिकेचा बाजार परवाना विभागाचा महसूल वाढला होता. असे असताना आता बाजार परवाना विभाग पूर्णपणे थंडावल्याचे चित्र आहे.
टिळकनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गणगे आपल्या सहकाऱ्यांसह शुक्रवारी सकाळी पत्रीपूल भागातील न्यू गोविंदवाडी भागात गस्त घालत होते. त्यांना गुप्त माहिती मिळाली की या भागातील अमजद मोहम्मद अली कुरेशी हे आपल्या राहत्या घरात एका प्राण्याची मांस विक्रीसाठी कत्तल करत आहेत. पोलिसांनी तातडीने अमजद यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी ते घरात एका प्राण्याची कत्तल करत होते. पोलिसांनी त्यांना प्राणी कत्तल करण्याचा परवाना विचारला. कोणता प्राणी कत्तल केला याची विचारणा केली. त्यांनी परवाना नसल्याचे आणि प्राण्याचे नाव सांगण्यास नकार दिला.
पोलिसांनी अमजद यांच्या घरातील ४० हजार रूपये किमतीचे १७५ किलो वजनाचे मांस जप्त केले. त्यांच्या विरूध्द टिळकनगर पोलीस ठाण्याचे हवालदार श्रीकृष्ण कानडे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल केला. जुनी गोविंदवाडी भागातील गुरू आणि अशफी हे अमजद कुरेशी यांना मांंस विक्रीसाठी आणून देतात, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्राण्याचे मांस अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे.
आतापर्यंत अमजदने आपल्या घरात किती प्राण्यांची कत्तल केली आहे. किती मांस विक्री केली आहे. ते हे प्राणी कोठून आणत होते या दिशेने टिळकनगर पोलीस तपास करत आहेत.