बांधकाम कचरा टाकणाऱ्या, कांदळवनांची कत्तल करणाऱ्यांवर लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किशोर कोकणे

ठाणे : भिवंडी, कशेळी, काल्हेर, मुंब्रा, दिवा, शीळ यांसारख्या खाडी पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातील खारफुटीचे संरक्षण व्हावे यासाठी राज्य सरकारने उशिरा का होईना या पट्टय़ात दिवस-रात्र गस्त घालण्यासाठी ३० सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यास जिल्हा प्रशासनांना परवानगी दिली आहे. खारफुटी कापून त्यावर हजारो टन राडारोडा रिता करणारी डेब्रिज माफियांची एक मोठी टोळी ठाणे तसेच आसपासच्या परिसरात कार्यरत असून या माफियांना रोखण्याचे आणि खारफुटी क्षेत्रावर जागता पहारा देण्याचे आव्हान या सुरक्षारक्षकांना यापुढे पेलावे लागणार आहे. 

 येत्या १० ते १२ दिवसांत हे सुरक्षारक्षक वनविभागाकडे उपलब्ध होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्या संदर्भाचा प्रस्ताव वनविभागाने राज्य शासनाकडे सादर केला होता. या सुरक्षारक्षकांमध्ये एक बंदूकधारी कर्मचारीही असणार आहे. सुरक्षारक्षकांची कळवा आणि भिवंडीतील कशेळी भागात नेमणूक केली जाणार असून येथील खारफुटीच्या जागांमध्ये त्यांच्याकडून गस्त घातली जाणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ाला खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणात खारफुटी क्षेत्र लाभले आहे. जिल्हा प्रशासन आणि वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या खारफुटींचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. भूमाफियांकडून खारफुटी नष्ट केल्या जात असून त्या ठिकाणी घरे, रस्ते बांधल्याचेही प्रकार उघड झाले आहे. त्यानंतर जाग आलेल्या राज्य शासनाने ठाणे जिल्ह्य़ातील काही खारफुटी क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. मात्र त्यानंतरही छुप्या पद्धतीने खारफुटींची तोड सुरूच आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कारवाई करणे शक्य होत नसल्याचा दावा वनविभागाकडून केला जातो. त्यामुळे खारफुटींची कत्तल रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वीच वनविभागाने राज्य शासनाकडे सुरक्षारक्षक मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे.  या ३० सुरक्षारक्षकांमध्ये एक बंदुकधारी, चार ते पाच महिला कर्मचारी आणि उर्वरित पुरुष कर्मचारी असतील.  तीन सत्रांमध्ये हे कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

कळवा खाडीजवळ बंदोबस्त

कळवा आणि कशेळी भागात मोठय़ा प्रमाणात खारफुटींची कत्तल होऊ लागली आहे. कळवा येथील खाडीलगत सुमारे पाच हेक्टर जागेत खारफुटींचे राखीव वनक्षेत्र आहे. या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. येथील झोपडय़ांवर कारवाई करून या जागेचे संरक्षण करण्यासाठी येथे १५ सुरक्षारक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. तर कशेळी भागातही भूमाफियांनी खाडी आणि खारफुटींवर भराव टाकून इमारती आणि घरांची बांधकामे केली आहेत. या भागातही १५ सुरक्षारक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. कशेळी येथे संवेदनशील क्षेत्रात सीसीटीव्ही बसविण्याचाही प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाकडे सुरक्षारक्षक पुरविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून आता सुरक्षा मंडळाकडून ३० सुरक्षारक्षक आमच्याकडे उपलब्ध होणार आहे. या सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून खारफुटींच्या क्षेत्रावर गस्ती घातली जाणार आहे.

– चेतना िशदे, वन परिक्षेत्र अधिकारी, कांदळवन कक्ष.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appointment security guards for protection thorns ssh
First published on: 29-09-2021 at 01:17 IST